

कोल्हापूर (पुढारी वृत्तसेवा) : ज्ञानेश्वर माऊली… तुकाराम असा गजर, खांद्यावर भगवी पताका घेतलेले वारकरी, टाळकर्यांकडून हरिनामाचा जयघोष, ढोल पथकांचा सहभाग आणि वरुणराजाच्या साथीने बुधवारी नंदवाळ पायी दिंडीची नगरप्रदक्षिणा निघाली. शहराच्या मुख्य मार्गावरून जुना राजवाडा परिसरात रिंगण सोहळा झाला. गुरुवारी सकाळी मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरात पालखीचे पूजन होऊन दिंडी प्रतिपंढरपूर नंदवाळकडे रवाना होईल.
आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर मानल्या जाणार्या नंदवाळकडे पायी दिंडी निघते. बुधवारी या पायी दिंडीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. विठ्ठल मंदिरात माजी नगरसेवक सचिन चव्हाण व जयश्री चव्हाण यांच्या हस्ते अभिषेक व पूजा झाली. दुपारी चारच्या सुमारास मंगळवार पेठेतील नाथागोळे तालीम मंडळाजवळ ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी क्रीडाईचे महेश पोवार, दिंडीचे प्रमुख आनंदराव लाड महाराज, बाळासाहेब पोवार, दीपक गौड, भगवान तिवले, संभाजी पाटील उपस्थित होते.
पुईखडी येथे आज रिंगण सोहळा
गुरुवारी सकाळी मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरातून सकाळी 7.30 वा. पालखी नंदवाळकडे रवाना होईल. खंडोबा तालीम येथे बेल, भंडारा वाहणे व उभे रिंगण होणार आहे. यानंतर पुईखडी येथे गोल रिंगण होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यानंतर दिंडी पुढे मार्गस्थ होईल
भरपावसात रिंगण
मिरजकर तिकटी, महाद्वार रोडमार्गे दिंडी जुना राजवाडा परिसरात आली. याठिकाणी वारकरी, टाळकरी, भाविकांच्या सहभागातून रिंगण पार पडले. भर पावसात सुरू असलेला रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशा पथकाने येथे सादरीकरण केले. महिलांनीही फुगडीचा फेर धरला होता.