कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एनसीसीच्या कोल्हापूर मुख्यालयामध्ये एअरफोर्स प्रशिक्षण देणारी एअरविंग सुरू करण्याची मागणी मान्य झाली आहे. भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाकडून (एएआय) कोल्हापूर विमानतळ येथे एअर एनसीसी युनिटच्या फ्लाईंग ट्रेनिंग हब उभारण्यासाठी 2.35 एकर जागा 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास मंजुरी मिळाली आहे. यासाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसाठी एअरविंग एनसीसीच्या कोल्हापूर मुख्यालयात सुरू करण्याची मागणी आ. पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. कोल्हापुरात 1960 पासून एनसीसीचे ग्रुप हेडक्वार्टर असून आर्मीच्या 8 व नेव्हीचे 1 युनिट कार्यरत आहे. आर्मी व नेव्हीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. मात्र एअरफोर्सचे प्रशिक्षण उपलब्ध नसल्याने सरकारचे लक्ष याकडे आ. पाटील यांनी वेधले होते. यावर मंत्री संजय बनसोडे यांनी याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले होते.
श्री दादूमामा ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर देसाई (माजी वायुसैनिक) यांनी कोल्हापुरात एनसीसीचे हेडक्वार्टर सुरू व्हावे म्हणून सतत 11 वर्षे आ. पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत होते. माजी खासदार संभाजीराजे यांनीही याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. एएआय बोर्डच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कोल्हापूर विमानतळ येथे एअर एनसीसी युनिटच्या फ्लाईंग ट्रेनिंग हब उभारण्यास मंजुरी देण्यात आली.