SSC Result: शिरगावातील कष्टकरी माता-पित्यांच्या स्वप्नांना आकार; अनुजाची यशाला गवसणी

SSC Result: शिरगावातील कष्टकरी माता-पित्यांच्या स्वप्नांना आकार; अनुजाची यशाला गवसणी

सामान्य परिस्थितीचा कसलाही बाऊ न करता स्व-अध्ययनाच्या जोरावर अनुजा रमेश यादव (रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) या विद्यार्थिनीने दहावी शालांत बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गणांसह घवघवीत यश (SSC Result)   मिळवले. जिद्दीला चिकाटीची जोड देत ध्येयाने अभ्यासाला वाहून घेत सामान्य कुटुंबातील अनुजाने परिस्थितीलाच एकप्रकारे झुकविले आहे.

अंगणवाडी मदतनीस म्हणून सेवेत असणारी आई सविता, शेतकरी वडील रमेश आणि नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला तिचा मोठा भाऊ यांच्या चेहऱ्यावरील आनंद अनुजाच्या यशाने द्विगुणित झाला. कष्टकरी माता-पित्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी अनुजाला अभियंता क्षेत्र खुणावत आहे. त्यादृष्टीने प्राधान्याने पुढील शैक्षणिक यशात सातत्य राखण्याचा प्रयत्न असल्याचे (SSC Result Maharashtra 2023) अनुजा हिने 'दै. पुढारी'शी बोलताना सांगितले.

SSC Result : एनएमएमएस या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन

शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील अनुजा यादव हिने श्री बालदास माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असताना तिने एनएमएमएस या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. अनुजाने दहावी शालांत परीक्षेची तयारी करीत असताना अतिरिक्त शिकवणीचा मार्ग न धरता शाळेतील शिक्षकांच्या अध्यापनावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून घरी दैनंदिन सहा ते सात तासांच्या स्व-अध्ययनावर भर दिला होता. याचेच फळ म्हणून तिने विद्यालयात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविला. या नेत्रदीपक यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच ग्रामस्थांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अनुजाने सामाजिक शास्त्र (९६), गणित (९१), विज्ञान आणि तंत्रज्ञान (९१), मराठी (९२) या विषयांत तिने चुणूक दाखवून दिली आहे. पुढे 'पीसीएम' ग्रुपच्या माध्यमातून बारावी विज्ञान आणि त्यानंतर अभियंता होण्याचे स्वप्न अनुजाने बाळगलेले आहे. शिक्षणाची पुढील वाट त्याच उमेदीने तिला खुणावत आहे. यासाठी मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आणि कष्ट करण्याची तयारी असल्याची भावना अनुजाच्या आई-वडिलांनी 'दै पुढारी'कडे व्यक्त केली.

'माझ्या यशाचा घरच्यांना झालेला आनंद माझ्यासाठी मोठा क्षण आहे. माझ्यातील सुप्त इर्षेला आई-वडिलांनी प्रेरणा दिली. गुरू आणि मैत्रिणींनी अभ्यासात मोलाचे सहकार्य केले. यापुढेही शैक्षणिक यशात सातत्य राखून मला अभियंता व्हायचे आहे.'
– कु. अनुजा रमेश यादव, शिरगाव ता. शाहूवाडी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news