[author title="आशिष शिंदे" image="http://"][/author]
कोल्हापूर : जिल्ह्यात आता चक्क सोशल मीडियावरील पोस्टमुळे गुन्हेगारी फोफावत आहे. करमणूक आणि मनोरंजनासाठी तयार करण्यात येणार्या रील्समुळे आज भररस्त्यात खून होत आहेत. भाईगिरीचे हॅशटॅग, कॉलर उडवत धमक्या देणारे फोनकॉल्सचे ऑडिओ वापरत केलेल्या रील्समुळे फॉलोअर्स वाढू लागतात. मित्रांमध्ये वाह… वाह सुरू होते, मुलींमध्ये क्रेझ तयार होते. मग काय गल्लीतील भाई शहरातील भाई बनण्याची स्वप्ने बघू लागतो. यातून खुनशी रील्स बनविण्याची सुरुवात होते आणि नकळत असामाजिक व्यक्तिमत्त्व विकाराच्या (अँटिसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर) विळख्यात अडकतो.
फॉलोअर्स, व्ह्यूजची क्रेझ बेततेय जीवावर
इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स आणि व्ह्यूजची सध्या क्रेझ सुरू आहे. आपले फॉलोअर्स वाढावेत,
यासाठी भन्नाट आयडियांवर
रील्स बनवण्यासाठी तरुणाई धडपडत आहे. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती निर्माण होते. मात्र, याच भन्नाट आयडिया सध्या अनेकांच्या जीवावर बेतत आहेत.
अल्गोरिदम लावतो सवय
प्रत्येकाच्या स्क्रीनवर येणार्या रील्स या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकासाठी त्याच्या आवडीनुसार एक अल्गोरिदम सेट होते. हा अल्गोरिदम सेट झाल्याने तुमच्या आवडीच्याच रील्स तुम्हाला दिसू लागतात. यामुळे तासन्तास आपण त्या पाहत जातो.
असामाजिक व्यक्तिमत्त्व विकाराची लक्षणे
वारंवार नियम, कायदे मोडण्याची वृत्ती तयार होणे, एखाद्याची फसवणूक, धमकी देण्याचे धाडस येते, चिडचिड आणि प्रचंड खुनशीपणा निर्माण होणे, बेजबाबदारपणे वागणे, बेदरकारपणे वाहने चालवल्याने आनंद मिळू लागतो.
रील्स आणि सोशल मीडियामुळे असामाजिक व्यक्तिमत्त्व विकाराचा धोका वाढला आहे. यामुळे सध्या 70 टक्के नागरिकांना निद्रानाशाचा त्रास सुरू आहे. विशेष करून याचा किशोरवयीन आणि शालेय मुलांना सर्वाधिक धोका आहे. यामुळे पालकांनी लक्ष द्यावे.
-डॉ. व्यंकटेश पवार, मानसोपचारतज्ज्ञ, सीपीआर