पन्हाळा, पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा येथील पुसाटी बुरुजाच्या पश्चिम बाजुच्या तटबंदी मध्ये स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या शिवप्रेमी मावळ्यांना लोखंडी तोफ गोळा सापडला आहे. गेल्या आठवड्यात अंधारबाव येथे फुटलेला लोखंडी तोफ गोळा सापडला होता. आज पुन्हा आणखी एक गोळा सापडल्याने पन्हाळा इतिहासला उजाळा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजा शिवछत्रपती परिवार ही संस्था पासून अखंड महाराष्ट्रभर दुर्गसंवर्धनाच काम करत आहे. त्याच परिवाराचा एक विभाग 'कोल्हापूर परिवार' दर महिन्याच्या एका रविवारी किल्ले पन्हाळगड/किल्ले रांगणा येथे गडस्वच्छता व संवर्धन मोहीम राबवतो. याच अंतर्गत आज रविवार (दि.३) रोजी राबविण्यात आलेल्या ४७ व्या मोहिमेत पुसाठी बुरुजाकडे स्वच्छता मोहीम करताना एक लोखंडी तोफगोळा सापडला आहे.
या मोहिमेत एकूण १५१ मावळे/रणरागिणी उपस्थित हा सदर तोफ गोळा दिसल्यानंतर या परिवाराचे अध्यक्ष उमेश डकावे बाबासो जाधव, मोहन कोकणे, विजय पाटील यांनी हा तोफ गोळा पुरातत्व विभागाचे लिपिक श्रे. तांदळे यांच्याकडे जमा केला आहे. पन्हाळा परिसरात सापडत असलेले ऐतिहासिक वस्तूंचे पन्हाळ्यातच वस्तू संग्रहालय उभारण्यात यावे. या वस्तू पन्हाळ्यातच जतन केल्या जाव्यात, अशी मागणी राजा शिवछत्रपती परिवाकचे अध्यक्ष उमेश डकावे आणि विजय जगदाळे यांनी केली आहे.