

सुभाष पाटील
विशाळगड : महायुती सरकारने गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत यासाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी 'आनंदाचा शिधा' योजना राज्याच्या आर्थिक अडचणींमुळे आता संकटात सापडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवापाठोपाठ आता दिवाळीतही लाभार्थ्यांना हा शिधा मिळण्याची शक्यता धुसर झाली असून, ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्हे आहेत.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या योजनेत रेशन कार्डधारकांना सणांच्या निमित्ताने प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चनाडाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. एकट्या शाहूवाडी तालुक्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब गटातील तब्बल ३१,१४६ नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत आणि ते सर्व जण शिधा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यात सध्या असलेल्या आर्थिक चणचणीमुळे या योजनेसाठी निधीच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील ६० लाख हेक्टरवरील पिके वाया गेली असून, लाखो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत, किमान दिवाळीत तरी सरकारकडून 'आनंदाचा शिधा' देऊन दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी आणि गरिबांना होती.
मात्र, दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाही, शासकीय पातळीवर या योजनेबाबत कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही. इतक्या कमी वेळेत शिधा वाटप करणे शक्य नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत असल्याने यंदाची दिवाळी शेतकरी आणि गरिबांना फराळाविनाच साजरी करावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
महायुती सरकारने निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यासाठी अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. मात्र, सत्तेवर येताच आर्थिक चणचणीमुळे अनेक लोकप्रिय योजनांना 'कात्री' लागण्यास सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना 'आनंदाचा शिधा' मोठा आधार ठरला असता, पण या योजनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यापासून या योजनेसाठी निधीच देण्यात आलेला नसल्याचे समजते, ज्यामुळे ही योजना कायमचीच बंद होणार की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.
गरीब आणि गरजू कुटुंबांच्या तोंडाला पाणी पुसले जात असल्यामुळे आता विरोधक या मुद्यावरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे. 'आनंदाचा शिधा' योजना कायम राहणार की बंद होणार, याकडे लाखो लाभार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
गट लाभार्थी संख्या
अंत्योदय २,८०६
प्राधान्य कुटुंब २८,३४०
एकूण ३१,१४६