कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शन रांगेसाठी भवानी मंडपातील शेतकरी बझारच्या इमारतीचा वापर केला जाणार आहे. याकरिता ही इमारत ताब्यात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत. त्यानुसार सोमवारी (दि.25) या इमारतीचा ताबा घेतला जाणार आहे.
नवरात्रोत्सवात भाविकांची होणारी गर्दी, यानंतर नाताळ सुट्टी निमित्त होणारी पर्यटक, भाविकांची गर्दी यामुळे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, आवश्यक सुविधा पुरवता याव्यात याकरिता दर्शन रांगेसाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता आहे. नवरात्रात भवानी मंडपातील मोकळ्या जागेत मंडप घातला जातो. मात्र, आपत्ती व्यवस्थापनाच्या द़ृष्टीने हा परिसर मोकळा असणे आवश्यक असल्याने दर्शन रांगेसाठी या इमारतीचा भूमिगत तळ मजला, तळ मजला व पहिला मजला वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी देवस्थान समितीने केली. याबाबतचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सादर करण्यात आला होता.
या अहवालानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रेखावार यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, प्रकरण 11 अंतर्गत कलम 65, पोट कलम(ब) अन्वये ही जागा पुढील आदेश होईपर्यंत ताब्यात घेत असल्याचे आदेश शुक्रवारी काढले. या आदेशानुसार जागा कब्जात घेऊन त्याचा ताबा देवस्थान समितीकडे देण्याचे आदेशही करवीर मंडल अधिकार्यांना देण्यात आले. त्यानुसार शनिवारी ताबा घेण्याची प्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, सार्वजनिक सुट्टी असून या इमारतीचा वाद न्यायप्रविष्ट आहे तसेच शेतकरी संघाच्या अशासकीय प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई उपस्थित नसल्याने ताबा प्रक्रिया झाली नाही. दरम्यान, याबाबत करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी देसाई यांच्याशी संपर्क साधला. या जागेचा ताबा आता सोमवारी घेऊन तो देवस्थानकडे देण्यात येणार आहे. या इमारतीत दर्शन रांगेसह हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा दिल्या जाणार आहेत.
प्रशासक मंडळाचे अध्यक्ष देसाई म्हणाले, शनिवारी दुपारी चार वाजता करवीर तहसीलदार यांनी संघाला नोटीस दिली आणि पाच वाजता इमारतीचा ताबा द्या, अन्यथा कुलपे तोडून ताबा घ्यावा लागेल, असे सागितले. चाळीस हजार सभासदांचा शेतकरी संघ आहे. तुम्हाला एकतर्फी या इमारतीचा ताबा घेता येणार नाही. यामुळे याबाबत फेरविचार करावा, अशी विनंती केली; पण त्यानी ते ऐकली नसल्याचे देसाई यांनी सांगितले.