कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 'उदं गं अंबाबाई उदं', 'आई…, अंबाबाईच्या नावानं चांगभलं…', 'अंबा माता की जय…' यासह विविध घोषणा, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि हजारो भाविकांची उत्साही उपस्थिती अशा भक्तिमय वातावरणात करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचा रथोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा झाला. सायंकाळी पाऊस पडून गेल्याने वातावरणातील गारव्यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसर्या दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या रथोत्सवाची परंपरा शाहूनगरीत सुरू आहे. यंदा हा रथोत्सव बुधवारी रात्री उत्सात साजरा करण्यात आला. सोहळा पाहण्यासाठी अवघे शहर नगरप्रदक्षिणेच्या मार्गावर एकवटले होते. नेत्रदीपक विद्युत रोषणाई, सप्तरंगी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, अंबाबाईच्या प्रतिकृतींची आकर्षक पूजा, पुष्पवृष्टी अशा मनोहारी वातावरणात रात्री उशिरापर्यंत सोहळा सुरू होता.
रथाचे पूजन जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी केले. यावेळी सचिव सुशांतकिरण बनसोडे, धर्मादाय विभागाचे अधिकारी शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई आदी उपस्थित होते. दरम्यान, माजी आमदार मालोजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी रथोत्सवात आवर्जुन उपस्थिती लावली.
अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजातून रथ मानकरी, घोडे अशा पारंपरिक लवाजम्यासह नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. महाद्वार रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोड, जुना राजवाडा, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौकमार्गे अंबाबाई मंदिर असा रथोत्सवाचा मार्ग होता. जागोजागी रथाचे स्वागत भाविकांनी विविध प्रकारे केले. जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरात छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने रथाचे भव्य स्वागत करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित रथोत्सवात विविध संस्था-संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्री महालक्ष्मी भक्त मंडळ-धर्मशाळा व श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट यांच्या वतीने प्रदक्षिणा मार्गावर भव्य विद्युत रोषणाई व आतषबाजी करण्यात आली. न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे मुंबईमधील कायनेटिक बॉलची भव्य विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली. रथोत्सवाच्या मार्गावर विविध सेवाभावी संस्था-संघटनांच्या वतीने मसालेभात व शिरा प्रसादाचे वाटप करण्यात आले. ढोल-ताशा पथकाने वातावरण निर्मिती केली. रथोत्सवाचा सोहळा भाविकांकडून मोबाईलवर आवर्जुन टिपण्यात आला.
जोतिबा यात्रेच्या तिसर्या दिवशी कोल्हापुरात शिवछत्रपती व ताराराणी यांचा रथोत्सव साजरा केला जातो. या रथोत्सवाचे आवातन देणारे फलक 'मावळा कोल्हापूर'च्या वतीने अंबाबाई रथोत्सवाच्या मार्गावर लावण्यात आले होते. भाविकांनी या फलकाची छायाचित्रे काढून सोशल मीडियावरून व्हायरल केली.