

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर व जोतिबा परिसर विकासाला लवकरच प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून आठवडाभरात दाखल झालेल्या निविदा उघडल्या जाण्याची शक्यता आहे. यानंतर निविदा मंजूर झालेल्या, कंपनीकडून पहिल्या टप्प्यातील कामांनाही प्रत्यक्ष सुरुवात करण्याचे नियोजन आहे.
अंबाबाई देवस्थान परिसर विकासासाठी 1445 कोटी 97 लाख रुपयांचा तर जोतिबा देवस्थान विकासासाठी 259.59 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 143.90 कोटी रुपयांचे अंबाबाई मंदिर संवर्धनाशी संबंधित कामे केली जाणार आहेत. जोतिबा मंदिरातही मंदिर संवर्धनाचे काम पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे.
अंबाबाई मंदिरासाठी 34 कोटी 78 लाख रुपयांची तर जोतिबा मंदिरासाठी 33 कोटी 90 लाख रुपयांच्या संवर्धनाच्या कामांची निविदा राज्य पुरातत्त्व विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची मुदत संपली आहे. दाखल झालेल्या निविदांच्या छाननीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. यामुळे येत्या एक-दोन आठवड्यात निविदा उघडल्या जाण्याचीही शक्यता आहे.
निविदा अंतिम केल्यानंतर संबधित कंपनीला काम सुरू करण्याबाबत कार्यारंभ आदेशही तातडीने दिले जातील, त्यानुसार या वर्षांतच अंबाबाई आणि जोतिबा मंदिर परिसराच्या विकासाला सुरुवात करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.