

एकनाथ नाईक
कोल्हापूर : शहरातील गजबजलेले रस्ते असोत किंवा ग्रामीण भागातील शांत वाटा, कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या 11 महिन्यांत तब्बल 83,804 नागरिकांना कुत्र्यांनी लचके तोडले असून, रेबीजमुळे एका व्यक्तीचा बळी गेला आहे. ही आकडेवारी केवळ चिंताजनक नाही, तर नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारी आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला संस्थात्मक क्षेत्रांमधून भटकी कुत्री हटवण्याचे निर्देश दिल्याने, स्थानिक प्रशासनावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये जिल्ह्यात तब्बल 1 लाख 31 हजार 744 जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या होत्या, ज्यात 7 जणांचा रेबीजने मृत्यू झाला होता. मृतांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन, सांगली जिल्ह्यातील दोन आणि छत्तीसगड व कर्नाटक राज्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश होता. यावरून या समस्येची तीव्रता लक्षात येते. रात्री उशिरा घरी परतणारे कामगार, फिरायला बाहेर पडलेले नागरिक, पादचारी आणि वाहनचालक हे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रमुख लक्ष्य ठरत आहेत. अनेकदा अचानक अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्यांमुळे रस्त्यांवर अपघातही घडत आहेत. दिवसाढवळ्याही रस्त्यावरून चालणे मुश्कील झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
कुत्रा चावल्यानंतर किंवा त्याची नखं लागल्यास रेबीजचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधक लस घेणे अत्यावश्यक असते. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रे : येथे महिन्याला सरासरी 7,500 हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात.
ग्रामीण, उपजिल्हा, सामान्य रुग्णालये : या ठिकाणीही दरमहा हजारो रुग्ण दाखल होतात.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय : येथे दरमहा सरासरी 600 हून अधिक रुग्ण कुत्रा चावल्याने उपचारासाठी येतात. जिल्ह्यात अंदाजे 45 हजारांहून अधिक भटकी कुत्री आणि शहरात सुमारे 8 ते 10 हजार पाळीव कुत्री आहेत. वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.