कोल्हापूर : गेल्यावर्षी दुष्काळाचे चटके सोसायला लागल्यामुळे कर्नाटकने यंदा येईल तेवढे पाणी अलमट्टी धरणात भरून घ्यायला सुरुवात केलेली दिसत आहे. परिणामी, आताच अलमट्टी धरण 75 टक्क्यांपेक्षा जादा भरले आहे. अलमट्टी धरण लवकर भरणे म्हणजे सांगली-कोल्हापूरला यंदाही महापुराचा तडाखा बसण्याचे संकेत मिळत आहेत.
केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार, कोणत्याही धरणामध्ये पाणीसाठा करण्याबाबत काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार 31 मे या तारखेला धरणाच्या पाणी साठवण क्षमतेच्या साधारणत: 10 टक्के एवढाच पाणीसाठा असायला हवा. 31 जुलैपर्यंत धरणामध्ये 50 टक्के पाणीसाठा करायचा आहे. 31 ऑगस्टपर्यंत 77 टक्के पाणीसाठा करायचा आहे. त्यानंतर 15 सप्टेंबरनंतर परतीचा पाऊस आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाझर या माध्यमातून ऑक्टोबरअखेरीस धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असे नियोजन करण्याचे जल आयोगाला अपेक्षित आहे. मात्र, यंदा धरण भरण्याचे हे सगळे निकष कर्नाटकने गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे.
अलमट्टी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी आहे. त्यामुळे आजघडीला या धरणामध्ये 50 ते जास्तीत जास्त 60 टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा असायला पाहिजे होता. मात्र, आजघडीला अलमट्टीतील पाणी पातळी 517.84 मीटर असून, महत्तम पाणी पातळी 519 मीटर आहे. आज या धरणामध्ये 95.47 टीएमसी म्हणजेच 77 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. म्हणजे जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जवळपास 35-40 टीएमसी जादा पाणीसाठा आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद 60 हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याची आवक होत असून, विसर्ग मात्र केवळ 20 हजार क्युसेक आहे. त्यामुळे लवकरच हे धरण भरून ते 519 मीटरची महत्तम पातळी गाठण्याची चिन्हे दिसत आहेत.
पावसाळा अजून जवळपास दोन महिने असून, जुलैअखेरीपासून ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत चांगला पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. महाराष्ट्रातील धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि अलमट्टीच्या पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस, यामुळे अलमट्टीतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणे अपेक्षित आहे. तसे झाले तर अलमट्टीतून आवश्यकतेच्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करणे जिकिरीचे होऊन बसणार आहे. ऐनवेळी घाईगडबडीने केलेल्या विसर्गामुळे अलमट्टी धरणाच्या खालील भागात महापूरसद़ृश परिस्थिती निर्माण होते. 2005, 2019 आणि 2021 सालच्या महापुराच्या वेळी कर्नाटक जलसंपदा विभागाच्या या सावळ्यागोंधळाचा महाराष्ट्राला चांगलाच फटका बसलेला आहे. त्यामुळे यंदा कर्नाटक जलसंपदा विभागाने सतर्क राहण्याची गरज आहे.
गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच अलमट्टी धरण कोरडे ठणठणीत पडले होते. त्यामुळे विजापूर आणि बागलकोट जिल्ह्याला ऐन उन्हाळ्यातच दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या होत्या. त्यावेळी कर्नाटकच्या मागणीनुसार महाराष्ट्रातून काही प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते; पण त्या पाण्याने त्या भागाची तहानही भागली नव्हती आणि दुष्काळही कमी झाला नव्हता. त्यामुळे यंदा अलमट्टीतील पाणीसाठ्याच्या बाबतीत कर्नाटक सावध भूमिकेत दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून अलमट्टीत आतापासूनच अतिरिक्त पाणीसाठा करण्यात येत आहे; पण त्याचे परिणाम सांगली आणि कोल्हापूरला भोगावे लागण्याची शक्यता दिसत आहे.
जल आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे कर्नाटककडून कधीच पाळली जात नाहीत. पावसाला सुरुवात झाली की, महाराष्ट्रातून आणि अलमट्टीच्या पाणलोट क्षेत्रातून येईल तेवढे पाणी अलमट्टीत साठवायला सुरुवात केली जाते. शक्यतो धरणात जवळपास 80-90 टक्के पाणीसाठा झाल्यानंतरच कर्नाटक जलसंपदा विभागाकडून विसर्गाला सुरुवात करण्यात येते; पण दरम्यानच्या काळात दोन्ही राज्यांच्या धरणांमधील पाण्याची आवक आणि विसर्गाचे सगळे गणित बिघडून गेलेले असते. अलमट्टीचे बॅकवॉटर कोल्हापूर-सांगलीत शिरायला सुरुवात झालेली असते आणि दुसरीकडे इथल्या धरणांमधून विसर्गही सुरू झालेला असतो. परिणामी, महापूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटकने याबाबतीत योग्य समन्वय साधण्याची गरज आहे.