सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणारा महापुराशी अलमट्टी, हिप्परगी धरणाचा काही संबंध नाही, असे मत जल संपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ यांनी सांगली येथील एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
सांगली इंजिनिअर्स व आर्किटेक्चर असोसिएशन यांच्यावतीने 'सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात येणार्या महापुराला कारणे काय? व त्याला जबाबदार कोण' या विषयावर डॉ. धुमाळ यांचे भाषण आयोजित केले होते.
डॉ. धुमाळ म्हणाले, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीला 2005 मध्ये महापूर आला होता. त्यावेळी तत्कालीन जलसंपदामंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेवरून मी कर्नाटक राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली व अलमट्टी धरणामध्ये पाणी सोडण्यास सूचना केली. ती सूचना त्या अधिकार्यांनी व कर्नाटक शासनाने मान्य केल्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा धोका टळला.
डॉ. धुमाळ म्हणाले, अलमट्टी, हिप्परगी या दोन धरणामुळे सांगली, कोल्हापूरमधील महापुराचा धोका वाढतो, याबाबत दोन मतप्रवाह आहेत. परंतु माझ्या मते धरणाचा व महापुराचा काही संबंध नाही. अचानकपणे पाऊस पडल्याने महापूर येत असतो. कर्हाडपासून अलमट्टी धरणापर्यंत कृष्णा नदीची लांबी 367 किलोमीटर आहे. ही नदी वेडीवाकडी असल्यामुळे काही प्रमाणात महापुराचा धोका संभवतो. कृष्णा नदीच्या तुलनेने पंचगंगा व वारणा नदीच्या गावाला कमी धोका संभवतो.
इंजिनिअर अँड आर्किटेक्चर असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र कोळसे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सेक्रेटरी पंजाब मोरे, ट्रस्टी प्रमोद चौगुले, कुमारभाई मेहता, शेखर दांडेकर आदी यावेळी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील अनेक नामांकित अभियंते यावेळी उपस्थित होते.