जयसिंगपूर; संतोष बामणे : शिरोळ तालुक्यात अकिवाट व यड्राव असे दोन नवीन जिल्हा परिषद गट निर्माण करण्यात आले आहेत. तर तेरवाड, धरणगुत्ती, चिपरी, शिरढोण, हेरवाड असे पाच नवीन पंचायत समिती गण तयार करण्यात आले आहेत. 'शिरोळचा अकिवाट तर नवा यड्राव जिल्हा परिषद मतदार संघ होणार' या मथळ्याखाली 'दै.पुढारी'ने वृत्त प्रसिध्द केले होते. आज जिल्हाधिकार्यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण मतदारसंघांना अंतिम मंजूरी दिली. यामुळे दै.पुढारीने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
नवीन मतदारसंघ रचनेमुळे लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवारांना मतांची जुळवाजूळव करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पूर्वी शिरोळ तालुक्यात दानोळी, उदगांव, नांदणी, शिरोळ, आलास, दत्तवाड, अब्दुललाट असे सात जिल्हा परिषद मतदार संघ होते. दोन वर्षापूर्वी शिरोळ ग्रामपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा मिळाल्याने त्यावेळीच शिरोळ पं.सं.गट रद्द करण्यात आला होता. आता यात नव्याने बदल झाला असून, शिरोळऐवजी याच मतदारसंघातील अकिवाट हे मोठे गाव जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून पुढे आले आहे. दहा वर्षापूर्वीप्रमाणे असलेला यड्राव जि.प.मतदार संघ हा पुन्हा नव्याने अस्तित्वात आला आहे. यापूर्वी या मतदारसंघाला यड्राव व टाकवडे असे प.सं.गण होते. मात्र, आता यड्राव आणि चिपरी असे बदल करण्यात आले आहेत. तर नव्या अकिवाटला अकिवाट व तेरवाड नवी पंचायत समिती अस्तित्वात आली आहे.
अब्दुललाट जि.प.पूर्वी असलेला टाकवडे प.सं.गट रद्द करून आता अब्दुललाटला शिरढोण प.सं.करण्यात आला आहे. तर दत्तवाड मतदारसंघातील सैनिक टाकळी ही पंचायत समिती गण रद्द करून पुर्वीप्रमाणे हेरवाड करण्यात आली आहे. यापूर्वी नांदणी गटाला यड्राव प.सं. होता. यड्राव स्वतंत्र जि.प. झाल्याने नांदणीला धरणगुत्ती नवीन प.सं.गण तयार करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उदगांव, यड्राव, अब्दुललाट या तीन प.सं.गणात फक्त दोनच गावांचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून इच्छुक उमेदवार, लोकप्रनिधी यांच्या नजरा जि.प., प.सं.च्या प्रारूप प्रभाग रचनेकडे लागल्या होत्या. अखेर गुरुवारी जाहीर झाल्याने आता आरक्षणाकडे नजरा लागून राहिल्या आहेत. शिरोळ तालुक्यात करण्यात आलेली रचना ही भौगोलिक व लोकसंख्येच्या निकषावरून चांगल्यापध्दतीने करण्यात आली आहे. त्यामुळे शिरोळमधील 8 जि.प. गट 16 प.सं.गणात राजकीय खलबत्ते सुरू झाले आहेत.