

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सण-उत्सव, मोर्चे, आंदोलनांमध्ये पोलिसांच्या मदतीला होमगार्ड दिवसरात्र काम करतात. तुटपुंजा भत्ता असला तरी ग्रामीण भागातील अनेकांना याचा आधार आहे. वर्षातील ठराविक दिवसच काम मिळत असले तरी मागील तीन महिन्यांचा भत्ता थकीत आहे. गणेशोत्सवात विनाभत्ता होमगार्ड रस्त्यावर उभा आहे. (Kolhapur News)
गृहरक्षक दल अर्थात होमगार्ड ही एक पोलिसांच्या मदतीला असणारी यंत्रणा कार्यरत आहे. सर्व सण, उत्सवामध्ये होमगार्ड महत्त्वाची भूमिका बजावतात. 670 रुपये प्रतिदिन भत्ता मिळणार्या होमगार्डना मागील सहा महिन्यांपासून विनाभत्ता काम करावे लागत आहे. कोट्यवधी रुपयांची बिले गृह विभागाकडून मंजुरी अभावी प्रलंबित असल्याने पैसे ट्रेझरीकडे जमा झालेले नाहीत. स्थानिक कार्यालयाकडून सर्व बिलांची कामे पूर्ण झाली असली तरी ती स्वीकारण्यात न आल्याने सध्या तरी उधारीवर होमगार्ड काम करतो आहे.
मागील चार बंदोबस्तांचा भत्ता थकीत
रमजान ईद, बकरी ईद, मोहरम, जोतिबा षष्टी यात्रा बंदोबस्त या बंदोबस्तांसह कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव मे महिन्यापासून सलग बंदोबस्त नेमण्यात आला आहे. सलग बंदोबस्तासाठी 100 होमगार्डना रोटेशननुसार बंदोबस्त दिला जातो आहे. परंतु सध्याचा गणेशोत्सवाचा बंदोबस्तही विनाभत्ता करावा लागतो आहे. (Kolhapur News)
1479 जणांची नेमणूक
गणेशोत्सवासाठी सध्या 1479 होमगार्ड नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यात सर्वच पोलिस ठाण्यांच्या मदतीला होमगार्ड देण्यात आले आहे. ग्रामीण भागातून शहरात येणार्या अनेक होमगार्डना पेट्रोलसाठीही दुसर्याकडून पैसे घेऊन बंदोस्ताला यावे लागत आहे. मागील चार सणांचा भत्ता प्रलंबित असताना गणेशोत्सव आणि पुढे नवरात्रौत्सवाचा बंदोबस्तही विनाभत्ताच करावा लागणार का असा सवाल होमगार्डसमोर उभा आहे.