

जयसिंगपूर : श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी (ता.भूम जि. धाराशिव) येथे ७८ वर्षीय आचार्य श्री १०८ वर्धमानसागरजी महाराज यांनी गत २३ जूनपासून 'यम सल्लेखना' व्रत स्वीकारले आहे. आचार्यश्रींच्या या सर्वोच्च आणि अत्यंत कठोर धार्मिक व्रताची माहिती मिळताच संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभाग, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून दररोज हजारो जैन श्रावक, श्राविका व धर्मप्रेमी कुंथलगिरी येथे अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमाभागातून भाविकांचे जथेच्या जथे कुंथलगिरीकडे मार्गस्थ होत आहेत. सिद्धक्षेत्रावर होणारी भाविकांची अभूतपूर्व गर्दी लक्षात घेऊन मंदिर समिती व प्रशासनाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दूरवरून आलेल्या भाविकांना आचार्यश्रींचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी क्षेत्र परिसरात जागोजागी मोठ्या डिजिटल स्क्रीन उभारण्यात आल्या असून, त्यावरून थेट प्रक्षेपणाची (लाइव्ह स्ट्रीमिंग) विशेष सोय करण्यात आली आहे.
कुंथलगिरी हे दिगंबर जैन समाजात पवित्र सिद्धक्षेत्र मानले जाते. अत्यंत शांत, प्रसन्न आणि निर्मळ भावाने देह त्याग करण्याची ही धार्मिक प्रक्रिया आचार्यश्रींच्या दृढ आत्मबलाचे दर्शन घडवत आहे. त्यामुळे हजारोच्या संख्येने गर्दी होत आहे.
पूर्वाश्रमी गाव शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव
आचार्य श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज यांचे पूर्वाश्रमीचे (दीक्षेपूर्वीचे) नाव श्री पायगोंडा अडगोंडा पाटील असे होते. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री अडगोंडा पाटील आणि आईचे नाव श्रीमती मुरुदेवी अडगोंडा पाटील होते. त्यांनी बी.ए. (B.A.) आणि बी.एड. (B.Ed.) पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले होते. ते सुरुवातीपासूनच अध्ययनशील, धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे धनी होते. सांसारिक जीवनात राहत असतानाही त्यांच्या मनात वैराग्य आणि आत्मकल्याणाची भावना निरंतर जागृत होती. याच आध्यात्मिक प्रेरणेतून त्यांनी २ फेब्रुवारी २००४ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे आचार्य श्री १०८ सन्मती सागरजी महाराज (अंकलीकर) यांच्या करकमलांतून मुनी दीक्षा ग्रहण केली.
अन्न आणि जलाचा टप्प्याटप्प्याने त्याग
जैन धर्म परंपरेनुसार, जेव्हा शरीर वृद्धत्वामुळे किंवा गंभीर आजारपणामुळे आत्मसाधनेला आणि संयमाला साथ देत नाही, तेव्हा स्वेच्छेने आणि अत्यंत शांत चित्ताने अन्न-जलाचा टप्प्याटप्प्याने त्याग केला जातो. यालाच 'सल्लेखना समाधी' किंवा 'समाधीमरण' असे म्हणतात. शरीर आणि मनातील क्रोध, मान, माया, लोभ यांसारख्या सर्व वासना मंद करून आत्म्याला त्याच्या मूळ शुद्ध स्वरूपात विलीन करणे हा या व्रत उपासनेचा मुख्य हेतू असतो.