

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : येथील रेल्वे स्टेशनवरून नांदणी (ता. शिरोळ) येथे तीर्थराज भरतकुमार उपाध्ये (वय 32) या तरुणाला बेदम मारहाण करत अज्ञात सुमारे 3 ते 4 जणांनी अपहरण केल्याची घटना सोमवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. त्यानंतर उपाध्ये याला बोलेरो गाडीतून उदगाव बायपासमार्गे बेडकिहाळ (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथे नेऊन गंभीररीत्या मारहाण करून त्याला रस्त्याकडे फेकण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी रात्री तीर्थराज उपाध्ये हे कोल्हापूरहून पावणेआठच्या सुमारास कामावरून जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर आले होते. येथून मोटारसायकल घेण्याकरिता येत असताना अज्ञात 3 ते 4 व्यक्तींनी उपाध्ये यास पकडून बोलेरो जीपमध्ये घातले व जीप घेऊन निघून गेले.
त्यानंतर याबाबतची फिर्याद अभिनंदन उपाध्ये यांनी जयसिंगपूर पोलिसात दिल्यानंतर जयसिंगपूर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शोध मोहीम सुरू केली. यावेळी मोबाईल लोकेशनवरून उपाध्ये याचे लोकेशन बेडकिहाळ येथे दिसून आले. त्यानंतर पोलिस पथक मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास बेडकिहाळ येथे पोहचले असता उपाध्ये यास गंभीररीत्या मारहाण करून रस्त्याच्या कडेला टाकले असल्याचे दिसून आले.
त्यानंतर उपाध्ये यास तत्काळ इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अद्याप संशयित आरोपींचा शोध लागला नाही; तर अपहरण का केले याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.