कागल, पुढारी वृत्तसेवा : प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण हे सबंध भारतवर्षाचे अवतारी महात्मे आहेत. धर्म-जाती वेगवेगळ्या असल्या तरी संस्कृती एकच आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये आयोजित लोकोत्सव हा भारतीय संस्कृतीचा उत्सव आहे. संत कबीरदास, संत रहीमखान यांच्यासारखाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही जनमाणसामध्ये आदर निर्माण केला आहे. कारण ते सर्व जातीधर्मीयांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे, असे प्रतिपादन आडी (ता. चिकोडी) येथील श्री. दत्त देवस्थानचे अधिपती परमाब्धिकार प. पू. परमात्मराज महाराज यांनी केले.
कागलमध्ये गैबी चौकात आयोजित प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित लोकोत्सव कार्यक्रमाच्या प्रारंभात ते बोलत होते.
प्रभू श्रीराम माझा.. मी श्रीरामाचा..
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, समस्त देशवासीयांमध्ये प्रभू श्रीराम माझा.. मी प्रभू श्रीरामाचा…! ही भावना भारावलेली आहे. माझे आणि प्रभू श्रीरामांचे तर वेगळेच ऋणानुबंध आहेत. कारण माझा जन्म रामनवमीचा आहे. या आंतरिक भावनेतूनच कागलमधील भव्य-दिव्य श्रीराम मंदिराच्या बांधकामांमध्ये योगदान दिल्याचे आत्मिक समाधान मोठे आहे.
प. पू. परमात्मराज महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीराम मूर्ती पूजन व आरतीने लोकोत्सवाची सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजता महाराष्ट्रातील नामवंत भजनसम—ाटांचा चक्रीभजन जुगलबंदी सुरू झाली. अयोध्या येथील श्रीराम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी खुपिरे (ता. करवीर) येथील 200 हून अधिक वारकर्यांचा अखंड टाळ-मृदंगाचा गजर व पुष्पवृष्टी झाली.