कोल्हापूर : गर्भलिंग निदानप्रकरणी बोगस डॉक्टरलाही अटक; दोघांना पोलिस कोठडी

कोल्हापूर : गर्भलिंग निदानप्रकरणी बोगस डॉक्टरलाही अटक; दोघांना पोलिस कोठडी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मुलगाच होण्याचे औषध देऊन बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्या केल्याच्या संशयावरून पोलिसांनी अटक केलेल्या अमित केरबा डोंगरे (वय 33, रा. म्हाडा कॉलनी), कृष्णात ऊर्फ सुशांत आनंदा जासूद (33, रा. निगवे दुमाला) या दोघांना 20 जानेवारीपर्यंत 3 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कारवाईवेळी पळून गेलेला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार स्वप्निल केरबा पाटील (रा. बालिंगा) याला बुधवारी रात्री फुलेवाडी फाट्याजवळ अटक केली. नाना पाटीलनगर, म्हाडा कॉलनीत मंगळवारी रात्री छाप्याची कारवाई करण्यात आली होती.

डमी महिला पाठवून गर्भलिंग निदानाचे आणि मुलगाच होणार, असे औषध देऊन फसवणूक करण्याचा हा प्रकार स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार स्वप्निल पाटील हा पसार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. अन्य दोन संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अटकेतील कृष्णात जासूद हा राजकीय क्षेत्रात असल्याने त्याचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे अनेक राजकीय व्यक्तींचे पोलिस ठाण्यात फोन खणखणत आहेत. त्याला त्रास दिला जाऊ नये, यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे; तर काही स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन चौकशी केली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक युनूस इनामदार करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news