कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबईच्या सराफ व्यावसायिकाची एस.टी. बसमधून तब्बल दीड किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने असलेली बॅग (सॅक) चोरट्यांनी हातोहात लंपास केली. कोल्हापूर एस.टी. स्थानकावरून रविवारी (30 जून) सायंकाळी पुण्याला जाणार्या एस.टी. बसमध्ये हा प्रकार घडला. सोन्याची किंमत सुमारे 96 लाख आहे; मात्र दागिन्यांची मजुरी धरल्यास त्याची किंमत 1 कोटीपेक्षा जास्त होते.
याप्रकरणी सुजितसिंग सुखदेवसिंग चौहान (वय 42, रा. माऊंट एव्हरेस्ट बिल्डिंंग, प्लॅट न. 501, भक्ती पार्क, वडाळा पूर्व, मुंबई) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौहान हे सोने व सोन्याच्या दागिन्यांचे होलसेल व्यापारी आहेत. मुंबईतील मोठ्या सराफांकडून सोने आणून कमिशनवर त्याची विक्रीसुद्धा करतात. 28 जूनला सकाळी मुंबईहून ते निघाले. पुण्यात त्यांनी चार सराफांना दागिने दाखविले. दोन दिवस पुण्यात राहिल्यानंतर रविवारी, 30 जूनला सकाळी 9 वाजता ते स्वारगेटहून कोल्हापूरला निघाले. दुपारी 2 वाजता कोल्हापुरात पोहोचले. गुजरीत सायंकाळी 6 पर्यंत त्यांनी तीन सराफांना दागिने दाखविले; मात्र कोणीही दागिने घेतले नाहीत.
चौहान रविवारी सायंकाळी 6.30 वाजता पुण्याला जाण्यासाठी एस.टी. स्थानकावर गेले. 7.30 च्या कोल्हापूर-पुणे या शिवनेरी बसमध्ये त्यांना बुकिंग मिळाले. एस.टी.त बसल्यानंतर तीन नंबरच्या सीटवरील रॅकमध्ये त्यांनी सोन्याचे दागिने असलेली काळ्या रंगाची सॅक ठेवली. त्यानंतर ते मोबाईल हातात घेऊन बसले. यादरम्यान काही मिनिटांतच तब्बल दीड किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने असलेली सॅक चोरट्यांनी लांबविली. थोड्या वेळाने त्यांनी सॅककडे लक्ष दिले असता सॅक जागेवर नव्हती. त्यांना काही सुचेना. संपूर्ण बसमध्ये त्यांनी शोध घेतला; परंतु सॅक मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
सराफ व्यावसायिक चौहान यांनी एस.टी.मध्ये बसलेल्या ठिकाणीच सीटवरील रॅकमध्ये सॅक ठेवली होती. चौहान बसलेल्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरून चोरट्यांनी सॅक चोरून नेली, तरीही त्यांना समजले कसे नाही, असा प्रश्न पोलिस उपस्थित करत आहेत.
पोलिसांनी एस.टी. स्टँडवरील कोल्हापूर-पुणे फलाटावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. चौहान यांच्या मागे दोन अनोळखी व्यक्ती फिरत असल्याचे दिसत आहे. संबंधित व्यक्तींनी प्रवासाचे तिकीट काढले नाही किंवा त्यांनी प्रवासही केला नाही; परंतु ते एस.टी.मध्ये चढल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. त्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहेत.
सोमवारपासून (1 जुलै) देशभरात नवीन फौजदारी कलमे लागू करण्यात आली आहेत. दंडसंहिता कलमाऐवजी आता न्यायसंहिता कलम असणार आहे. कोल्हापुरात रविवारी (30 जून) सायंकाळी एक कोटीचे सोने लंपास होण्याची घटना घडली. त्यासंदर्भातील गुन्हा 1 जुलै रोजी दाखल करण्यात आला; मात्र घटना 30 जूनची असल्याने भा.दं.वि.सं. कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. नव्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला असता, तर तो 303 (2) नुसार पोलिसांना नोंद करावा लागला असता.