टेम्पो आणि मोटारसायकल अपघात : महापालिका टेम्पोने चिमुरडीला चिरडले

टेम्पो आणि मोटारसायकल अपघात : महापालिका टेम्पोने चिमुरडीला चिरडले
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचा टेम्पो आणि मोटारसायकल अपघात यामध्ये पाचगाव रोडवरील रायगड कॉलनी येथील अन्वी विकास कांबळे या चार वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. संभाजीनगर येथे रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. अपघातात बालिकेचे वडील गंभीर जखमी झाले. संतप्‍त जमावाने टेम्पोवर दगडफेक करून तोडफोड केली. त्यामुळे काही काळ तणाव होता.

विकास दिलीप कांबळे हे मूळचे वारे वसाहतीतील आहेत. सध्या ते रायगड कॉलनीतील नवीन घरी राहतात. ते संभाजीनगर रेसकोर्स परिसरात खासगी क्लास चालवितात. विकास हे मुलगी अन्वीला घेऊन वारे वसाहत येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलीवरून रायगड कॉलनी येथील घराकडे जात असताना संभाजीनगर येथे एका वाहनाचा दरवाजा उघडताना त्यांच्या हाताला धक्‍का लागला. त्यात तोल जाऊन मुलीसह ते जमिनीवर कोसळले. याचवेळी महापालिकेच्या टेम्पोने दोघांना फरफटत गेले. मेंदूला जबर इजा झाल्याने अन्वीचा जागीच मृत्यू झाला.

परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात हलविले. चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच जमाव संतप्‍त बनला. आईसह नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटणारा होता. संतप्‍त जमावाने टेम्पोवर दगडफेक करून तोडफोड केली. कांबळे कुटुंबीयांची अन्वी एकुलती होती. या घटनेमुळे वारे वसाहत व रायगड कॉलनीत हळहळ व्यक्‍त होत आहे.

अपघाताचा हॉटस्पॉट

टेम्पो आणि मोटारसायकल अपघात जेथे झाला तेथे एकाचवेळी अनेक दिशेने वाहने येत असतात. मिरजकर तिकटी, पाण्याचा खजिन्याकडून तसेच गजानन महाराजनगरकडून येणार्‍या वाहनांची संख्या मोठी आहे. यामध्ये बसेससह इतर वाहनांचा समावेश असतो. याच रस्त्यावरून वडापच्या गाड्याही भरधाव वेगाने जातात.तसेच टिंबर मार्केटच्या कमानीकडून येणार्‍या वाहनांची संख्याही मोठी आहे. तर कळंब्याकडून येणारी काही वाहनेही येथे वळतात. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची एकच गर्दी असते. शिवाय, वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी पोलिस यंत्रणा नसते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news