एफआरपीचे तब्बल १,४६५ कोटी थकीत | पुढारी

एफआरपीचे तब्बल १,४६५ कोटी थकीत

राशिवडे; प्रवीण ढोणे : सध्या राज्यात 189 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. 31 डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाच्या एफआरपीचे 8,299 कोटी रुपये (सुमारे 85 टक्के) शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता एफआरपी चे 1,465 कोटी रुपये (15 टक्के) थकीत आहेत. दुसरीकडे गत हंगामातील 594 कोटी रुपयांची थकीत एफ.आर.पी शेतकर्‍यांना अद्याप मिळालेली नाही.

राज्यात 136 सहकारी व 110 खासगी असे 246 साखर कारखाने आहेत. मागील हंगामात त्यापैकी 190 कारखाने कार्यरत होते. यंदाच्या हंगामात राज्यात एकूण 12.32 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. त्यातून एक हजार 96 लाख टन ऊस गाळप होण्याची शक्यता आहे. सरासरी साखर उतारा 11.20 टक्के मिळून राज्यात यावर्षी 122 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

चालू हंगामात सहकारी 101 व खासगी 101 मिळून एकूण 202 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 94 सहकारी व 96 खासगी अशा 190 कारखान्यांना साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी गाळप परवाना दिला आहे. यंदाच्या हंगामात दोन जानेवारीअखेर एकूण 189 कारखान्यांनी गाळप सुरू केले असून 489.50 लाख टन ऊस गाळप होऊन 47.55 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

डिसेंबरअखेर गाळप हंगाम घेतलेले कारखाने – 186, झालेले एकूण गाळप – 343.58 लाख टन, एकूण देय एफआरपी (तोडणी वाहतुकीसह) – 11145 कोटी, करारानुसार देय एफआरपी (तोडणी वाहतुकीसह) – 9752 कोटी, तोडणी वाहतुकीसह दिलेली एफआरपी – 8299 कोटी, थकीत एफआरपी – 1465 कोटी, 100 टक्के एफआरपी दिलेले कारखाने – 76, एफआरपीचे थकीत असलेले कारखाने – 110, मागील हंगामातील थकीत एफआरपी – 594 कोटी.

आतापर्यंत 505.91 लाख टन उसाचे गाळप

आजअखेर 505.91 लाख टन उसाचे गाळप होऊन 492.97 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यामध्ये कोल्हापूर विभाग गाळपासह उतार्‍यामध्ये नंबर वन आहे. तर सोलापूर विभाग दुसर्‍या तर पुणे विभाग तिसर्‍या क्रमांकावर आहे.

Back to top button