

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कसबा तारळे ते दुर्गमानवाड दरम्यान असलेल्या मांजरखिंड परिसरात रस्त्याच्या कडेला स्त्री जातीचे एक नवजात अर्भक रविवारी दुपारी आढळून आले. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्यानंतर अर्भकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवार असल्याने दुर्गमानवाड रस्त्यावर विठ्ठलाईदेवी च्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची वर्दळ होती. दुपारी तीनच्या दरम्यान कसबा तारळे येथील अनिल पानारी यांना मांजरखिंड परिसरातील वळणावर रस्त्याकडेला नाल्यात एका कापडात गुंडाळून पिशवीत ठेवलेले मृत अर्भक आढळून आले.
अज्ञात व्यक्तींनी दुचाकी वरून किंवा चालत्या वाहनातून पिशवी फेकल्या मुळे अर्भक अर्धवट पिशवी बाहेर दिसत होते. श्री. पानारी यांनी कसबा तारळे चे पोलीस पाटील विक्रम सनगर यांना या घटनेची माहिती देताच श्री. सनगर यांनी राधानगरी पोलीसात वर्दी दिली.
पोलीस उपनिरीक्षक श्री. घाडगे पोलीस नाईक सचिन पारखे, श्री. गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी कसबा तारळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून अर्भकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर कडे पाठवला. पोलीस नवजात अर्भक टाकलेल्या अज्ञात व्यक्तीचा तपास करत आहेत.