मेंदू, पोट, अस्थी विकारांचा जनआरोग्य सेवेत समावेश नाही | पुढारी

मेंदू, पोट, अस्थी विकारांचा जनआरोग्य सेवेत समावेश नाही

कोल्हापूर; एकनाथ नाईक : पोटविकार व त्यावरील शस्त्रक्रिया, आर्थोपेडिकच्या सर्व शस्त्रक्रिया, मेंदूसंबंधित शस्त्रक्रिया, फुफ्फुस आणि लिव्हर प्रत्यारोपण, कान, नाक, घसा यासह अन्य आजारांचा समावेश जनआरोग्य योजनेत करण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे. या सर्व आजारांवरील उपचार अत्यंत खर्चिक असून, मध्यमवर्गींयांच्याही आवाक्याबाहेरचे असल्याने त्यांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे.

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना रुग्णांना आधारवड ठरली आहे. राज्य सरकारने त्याची व्याप्ती वाढवत रुग्णांना मोठा आधार दिला आहे. आवाक्याबाहेर गेलेल्या उपचाराचे संकट रुग्णांसमोर आहे. मात्र, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. कारण, बहुसंख्य आजार या योजनेत नाहीत.

योजनेत राज्यातील रुग्णालयांची संख्या दुप्पट करून रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे. योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्या वाढवण्याबरोबरच अन्य आजारांचाही समावेश करणे गरजेचे आहे. जनआरोग्य योजनेमध्ये सध्या 492 हून अधिक रुग्णालये सहभागी आहेत. त्यापैकी 355 तालुक्यांपैकी 100 तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांतील रुग्णांना या योजनेद्वारे उपचार घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा लगतच्या तालुक्यामध्ये जावे लागते.

दिल्लीच्या धर्तीवर ‘हेल्थ वेलनेस सेंटर’

विशेष म्हणजे, उपचार वेळेत मिळाले नाहीत, म्हणून रुग्णांची हेळसांड टाळण्यासाठी दिल्ली येथील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर राज्यात हेल्थ वेलनेस सेंटर सुरू केली जाणार आहेत. या माध्यमातून प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत 971 वरून 1,300 आजारांवर इलाज केला जात आहे; पण अजूनही अनेक खर्चिक आजारांचा समावेश योजनेत करणे गरजेचे आहे, अशी मागणी रुग्णांसह नातेवाईकांनी केली आहे.

निकष शिथिल करून अतिदुर्गम तालुक्यांचा समावेश

उपचारासाठी रुग्णांना करावी लागणारी पायपीट, खर्च, वेळेत उपचारासाठी प्रत्येक तालुक्यात या योजनेंतर्गत एका रुग्णालयाचा समावेश केला जाणार आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागातील तालुक्यांमध्ये रुग्णालयांचा समावेश करताना गरज भासल्यास प्रसंगी निकष शिथिल केले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Back to top button