कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : देशात कोरोनाच्या तिसर्या लाटेची वर्दी घेऊन ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग चिंताजनक वळणाकडे निघाला असतानाच कोरोना लसीच्या बूस्टर डोसविषयी एक चांगले संशोधन पुढे आले आहे. युरोपामध्ये केलेल्या एका संशोधनात लसीचा तिसरा अर्थात बूस्टर डोस नागरिकांना ओमायक्रॉन संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्यापासून 88 टक्क्यांचे संरक्षण देत असल्याचे निष्कर्ष आहेत.
युरोपीय आरोग्य सुरक्षा संस्थेने अलीकडेच ओमायक्रॉन या कोरोनाच्या उत्परिवर्तीत विषाणूसंबंधी काही चाचण्या घेतल्या होत्या. या चाचण्यांतील उत्साहवर्धक निष्कर्षांमुळे युरोपातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात दिलासा मिळाला आहे. जगात कोरोनावरील डेल्टा या उत्परिवर्तीत विषाणूला लगाम घालण्यासाठी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या लसी बाजारात उपलब्ध केल्या होत्या.
या लसीच्या पहिल्या दोन डोसमुळे डेल्टाचे संकट सौम्य करण्यास मदत झाली. परंतु, ओमायक्रॉन या विषाणू रुपाच्या संसर्गाची ताकदच इतकी मोठी आहे की, रुग्ण दुपटीचा वेग आता एक-दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनावरील यापूर्वी दिलेेल्या पहिल्या दोन डोसमुळे नागरिकांना कोरोनापासून संरक्षण मिळते.
परंतु, सहा महिन्यानंतर नागरिकांच्या रक्तातील कोरोनाविरोधी प्रतिपिंडे कमी होऊ लागल्याने कोरोनाची शक्यता दुणावते, असा निष्कर्ष आहे. दुसर्या डोसनंतर सहा महिन्यांनी हे संरक्षण 52 टक्क्यांपर्यंत खाली घसरते. परंतु, बूस्टर डोस घेतल्यास हे संरक्षण 88 टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचा निष्कर्ष आहे. साहजिकच अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या प्रगत खंडांमध्ये तिसर्या डोससाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.