कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळेच निवडणूक लादली : मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळेच निवडणूक लादली : मुश्रीफ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : खा. संजय मंडलिक यांच्यावर दबाव टाकून दुसरे पॅनेल करण्यास भाग पाडले आहे. काही लोकांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळेच ही निवडणूक ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) लादली गेली आहे. ही व्यक्ती कोण ते सर्वांना माहिती आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिवसेनेसोबत कधीही दुजाभाव केला नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी आ. पी. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. मुश्रीफ म्हणाले, सर्व गटातील एकत्र किंवा स्वतंत्रपणे मतमोजणी झाली तर काहीच फरक पडणार नाही. विरोधकांना पराभवाची भीती असल्यानेच गटवार मतमोजणीसाठी दबाव आणल्याचे खोटे बोलत आहेत. आजरा आणि गडहिंग्लज कारखान्याला मदत देताना दुजाभाव केला नाही. थकबाकीदार कारखान्यांना आर्थिक मदत करताना अडचणी असतात, तरीही मदत केली. त्यावेळी विरोधकही संचालक असल्याने त्यांनाही माहिती आहे. बँकेतही निवडणुकीनंतर पुन्हा महाविकास आघाडी म्हणून एकत्र येणार काय? यावर थेट उत्तर न देता राज्यात अजून पाच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता कायम राहणार असल्याचे संकेत देत चेअरमनपदाचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, असे मुश्रीफ म्हणाले.

लोकांच्या हिताच्या योजना आणू. शेतकरी हीत जोपासतच बँक अजून प्रगतीपथावर नेऊ, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, पाच वर्षांतील कामाचा लेखाजोखा मतदारच मतातून मांडतील. जिल्हा बँक कोणाच्या हातात दिल्यानंतर प्रगती होईल हे मतदारांना चांगले माहिती आहे. पी. जी शिंदे, विश्वास जाधव, उत्तम कांबळे हे विरोधी आघाडीतील उमेदवार भाजप आघाडीचे आहेत. तीन शिवसेनेचे, तीन भाजपचे आणि एक काँग्रेसचा उमेदवार असे विरोधी आघाडीची रचना आहे. मग राजकीय पादत्राणे बँकेच्या बाहेर असली तरी आम्ही भाजपची पादत्राणे घालून बँकेतून बाहेर पडू, असे म्हणण्याला अर्थ नाही.

भोगावती कारखाना दरवर्षी कर्ज फेडतो. परतफेडीस उशीर झाल्यास ‘भोगावती’चा कर्जपुरवठाही विलंबाने झाल्याचे सांगून आ. पी. एन. पाटील म्हणाले, बारा तालुक्यांत गेल्यावर आम्हाला प्रश्न पडला की विरोधकांनी पॅनेल का केले आहे. 35 वर्षांत अशा प्रकारे आम्ही तालुक्यात प्रचारासाठी गेलो नाही. यंदा सभा घेतल्या. सभासद, शेतकर्‍यांना भेटलो. मात्र, बँकेच्या कारभाराबाबत कोणीही तक्रार केलेली नाही.

त्यांचे सहकारात अस्तित्व काय? ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक  ) 

ज्यांच्या पायालाच राजकारण लागले आहे, त्यांनी बँकेच्या बाहेर राजकीय पादत्राणे काढली तरी काय फरक पडेल? अशी टीका माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी केली होती. यावर ना. हसन मुश्रीफ यांनी क्षणाचाही विलंब न करता मिश्कील हसत माईक आ. पी. एन. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर आ. पाटील म्हणाले, करवीर तालुक्यातील सहकारात त्यांचे अस्तित्व किती आहे? ज्या काही 15-16 सेवा सोसायट्या आहेत त्याविरोधात मदतच केली. अनेकवेळा त्यांच्या विनंतीला मान देत नियम डावलून मदत केली आहे.

चांगला कारभार म्हणून भाजपची माघार ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )
बाबासाहेब पाटील असुर्लेकर आणि राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर किंवा गणपतराव पाटील यांच्यापैकी एकजण स्विकृत करण्याचा प्रस्ताव होता. शिरोळचा तिढा कायम राहिल्याने शिवसेनेने नाव दिल्यास स्विकृत जागेचे नाव जाहीर केले असते. भाजपने आमच्या कारभारावर खूष होवूनच सर्व जागा माघार घेतली. पाच जागा भाजपच्या असे सांगितले जात असले तरी विनय कोरे यांच्याशी चर्चा करुनच पॅनेलमधील उमेदवार ठरले असल्याचे मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

Back to top button