राधानगरी धरणाचा अवजड दरवाजा उघडलाच कसा? | पुढारी

राधानगरी धरणाचा अवजड दरवाजा उघडलाच कसा?

कोल्हापूर; सुनील सकटे : राधानगरी धरणाचे ( राधानगरी धरण ) सर्व्हिस गेट अचानक उघडल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केवळ मोजक्या लोकांना धरण क्षेत्रात प्रवेश असल्याने सर्व्हिस गेट घटना घडलीच कशी? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. पाटबंधारे विभागाने धरणांच्या सुरक्षित व्यवस्थापनासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

जिल्ह्यात लघुपाटबंधारे प्रकल्प 55, मध्यम धरणे 10 आणि मोठी चार अशी एकूण 69 लहान-मोठी धरणे आहेत, तर तब्बल 340 केटीवेअर बंधारे आहेत. पाटबंधारे विभागाच्या पाहणीत जिल्ह्यातील सात केटीवेअरची अवस्था गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील चार धरणांच्या सांडव्यांसह मुख्य दरवाजाजवळ गळती असल्याने या धरणांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या चारपैकी मेघोली धरणाचाही या धोकादायक धरणांत समावेश होता. मेघोली धरण फुटून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

पाटगाव धरणाच्या दरवाजातून मोठ्या प्रमाणात गळती होते. येणेचवंडी लघुपाटबंधारे तलाव, फये धरण आणि मुख्य दरवाजातून पाण्याची गळती होते. अनेक ठिकाणच्या केटीवेअरचे बरगे खराब झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राधानगरी धरणाच्या सर्व्हिस गेटचे प्रकरण घडल्याने पुन्हा एकदा पाटबंधारे विभागाची चिंता वाढली आहे. राधानगरी धरण परिसरात केवळ पाटबंधारे कर्मचारी व पोलिसांनाच प्रवेश आहे. इतरांना प्रवेश नाही. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मजुरांची वर्दळ असते. मात्र, घडलेल्या घटनेमुळे हा प्रकार पाटबंधारे विभागात चर्चेचा विषय बनला आहे.

असं घडलंच कसं? 

एकीकडे धरणावर कुणालाच प्रवेश दिला जात नाही. मग असा अवजड दरवाजा उघडलाच कसा? असा प्रश्न सामान्यांसह पाटबंधारे विभागातून विचारला जात आहे. प्रत्येक घटकाने आपली किमान जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास अशा घटना घडणारच नाहीत.

Back to top button