कोल्हापूर गूळ उद्योगाला घरघर; एक लाख रव्यांची घट | पुढारी

कोल्हापूर गूळ उद्योगाला घरघर; एक लाख रव्यांची घट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस आणि माथाडी कामगारांच्या संपाचा फटका कोल्हापुरी गुळाला ( कोल्हापूर गूळ ) बसला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील गूळ आवकेत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे एक लाख रव्यांची घट झाली आहे. यामुळे या विभागातील साडेसहा कोटींच्या उलाढालीला फटका बसला आहे.

कोल्हापुरी गूळ हे देशात नावलौकिक असलेले उत्पादन आहे. या विभागातून बाजार समितीची दरवर्षी साडेसहाशे कोटींची उलाढाल होते. यातून समितीला सहा ते सात कोटी रुपयांचा महसूल मिळतो, यामुळे हा विभाग निर्विघ्नपणे व सक्षमपणे चालावा, यासाठी समितीच्या प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे असते. पण येरे माझ्या मागल्या… या म्हणीप्रमाणे बाजार समितीकडून तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. याचा फटका गूळ उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे.

गुळाचा हंगाम एप्रिल महिन्यापासून गणला जातो; पण जिल्ह्यात दसर्‍याच्या मुहूर्तावर हंगाम सुरू होतो. मात्र, यावर्षी हंगाम सुरू होताच अवकाळी पाऊस सुरू झाला. हा पाऊस थांबला तोच विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी आंदोलन सुरू केले. त्यामुळे मार्केट बंद पडले, अशा प्रकारे हंगामाची सुरुवातच वादाने झाली. समितीच्या प्रशासनाने यात वेळीच लक्ष घालून हा वाद मिटवायला हवा होता; पण तसे प्रयत्न झाले नाहीत. उलट उत्पादकांना समितीकडून धमकावण्याचे प्रयत्न मिटिंगमध्ये झाले. त्यामुळेही शेतकरी नाराज झाले. अशा प्रकारे नोव्हेंबर महिन्यात पाच ते सहावेळा गूळ सौदे बंद पडले.

सातत्याने होणार्‍या अशा प्रकाराला गूळ उत्पादक शेतकरी अक्षरशः वैतागून गेले. गूळ बस्स, साखर कारखाने बरे, म्हणत करवीर तालुक्यातील दहा ते बारा गुर्‍हाळमालकांनी गुर्‍हाळघरे बंद ठेवून आपला ऊस कारखान्यांना पाठवला आहे. हीच परिस्थिती अन्य तालुक्यांत झाली. त्याचा परिणाम गुर्‍हाळ हंगाम सुरू होण्यावर झाला आहे. यातून गुळाची आवक एक लाख रव्यांनी घटली आहे.

गतवर्षी 27 डिसेंबरपर्यंत बाजार समितीत 10 लाख 16 हजार 904 गूळ रव्यांची आवक झाली होती. आता 9 लाख 44 हजार आवक झाली आहे. ही घट सुमारे 1 लाख रव्यांची आहे. गतवर्षी दररोज 4200 गूळ रव्यांची आवक होत होती. सध्या दररोज 3200 ते 4200 रव्यांची आवक होत आहे.

नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच फटका

गूळ हंगामाचा धडाका हा नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत अधिक असतो. त्याला कारणही तसेच पोषक असते. पण यावर्षी आंदोलनांचा फटका गुळाच्या उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे 3700 गूळ रव्यांची घट होत आहे.

Back to top button