कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : दिग्गजांना ‘क्रॉस व्होटिंग’ची धास्ती! | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : दिग्गजांना ‘क्रॉस व्होटिंग’ची धास्ती!

कोल्हापूर ; संतोष पाटील : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय असा रंग चढला आहे. शिवसेनेत जिल्हा बँकेच्या निमित्ताने नवा गट निर्माण झाला आहे. भविष्यातील राजकीय वाटचाल आणखी अवघड होऊ नये, यासाठी सत्ताधारी आघाडी शिवसेनेवर जहरी टीका टाळत आहे, तर शिवसेनेने आक्रमक बाणा सोडलेला नाही. सरमिसळ राजकारणामुळे दिग्गजांना क्रॉस व्होटिंगची धास्ती आहे. यातूनच बँकेच्या निवडणुकीत किमान सहा जागांवर आश्‍चर्यकारक निकाल लागण्याची शक्यता आहे.

वर्षभरापासून जिल्ह्यात विरोधी पक्षाच्या क्षीण झालेल्या ताकदीमुळे एकत्र राहण्यापेक्षा स्वतंत्र राहिल्याने पॉलिटिकल स्पेस पुन्हा मिळवण्याची संधी शिवसेनेने जिल्हा बँकेच्या निमित्ताने हेरली आहे. शिवसेनेचे विधानसभेच्या 10 पैकी सहा जागांवरील उमेदवार निश्‍चित आहेत. विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढावी लागणार असल्यानेच शिवसेना संधी शोधत होती आणि ती संधी बँकेच्या निमित्ताने मिळाली. वाढीव एका जागेच्या वादामुळे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाला. अपक्ष; परंतु शिवबंधनात अडकलेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी खा. निवेदिता माने यांनी मात्र दोन्ही काँग्रेससोबतच बँकेच्या राजकारणात राहणे पसंद केले.
बँकेच्या राजकारणाने पेटून उठलेल्या शिवसेनेने दोन्ही काँग्रेसचे जिल्हा आणि तालुक्यांतील नेते, यड्रावकर आणि माने यांच्यासह भाजपवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील राजकीय पट मांडताना दोन्ही काँग्रेसला शिवसेनेची भविष्यात नक्‍कीच गरज भासणार आहे. त्यामुळेच सेनेवर केलेल्या उपकारांची जाणीव करून देण्यापलीकडे दोन्ही काँग्रेस तुटेपर्यंत ताणणार नाही, हे स्पष्ट आहे. क्रॉस व्होटिंग करून एकमेकांचे राजकीय उट्टे काढण्याचा कार्यक्रम जोरात होणार
आहे.

शिरोळ तालुका सेवा संस्था गटातील राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. शेतीमाल प्रक्रिया गटात खा. संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रदीप पाटील-भुयेकर, मदन कारंडे ही दुरंगी लढत शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. बँक, पतसंस्था गटात आ. प्रकाश आवाडे, अनिल पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर असा तिरंगी सामना आहे. दूध संस्था गटात भैया माने आणि क्रांतिसिंह पवार-पाटील आणि महिला गटातील माजी खा. निवेदिता माने, श्रुतिका काटकर, रेखा कुराडे, लतिका शिंदे, विशेष मागास प्रवर्ग गटातील विश्‍वास जाधव आणि स्मिता गवळी आदी गटांत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता असून, धक्‍कादायक निकाल लागेल, असा अंदाज व्यक्‍त केले जात आहेत.

राजकारणाची नवी दिशा

प्रक्रिया, महिला गट, बँका आणि पतसंस्था गटासह शिरोळ तालुका संस्था गटातील लढती राजकीय सारीपाट बदलणार्‍या ठरू शकतात. क्रॉस व्होटिंग होऊ नये, यासाठी जोडण्या घातल्या जात आहेत. कोल्हापूरच्या राजकारणात धक्‍कादायक निकालाची परंपरा असून, जिल्हा बँकेतील काही निकाल राजकारणाची नवी दिशा स्पष्ट करणारे ठरतील.

प्रचाराच्या तोफा धडाडणार

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मतदान 5 जानेवारीला होणार असून, प्रचाराच्या तोफा धडाडण्यास सुरुवात झाली आहे. तुरंबे (ता.राधानगरी) येथून सोमवारपासून शिवसेना आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. तर सत्ताधारी आघाडीने शनिवारी(दि. 25) गडहिंग्लज येथून प्रचार शुभारंभ करत आता तालुकावार मेळाव्यांचे आयोजन केले आहे.

जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत भाजप-शिवसेना आघाडी विरोधात सत्ताधारी अशी लढत होती. संजय मंडलिक हे सत्ताधारी आघाडीसोबत राहिले होते. भाजप आघाडीनेही सत्ताधार्‍यांना साथ दिल्याने यावर्षीची बँकेची निवडणूक बिनविरोध झाली नाही तरी सहज एकतर्फी होईल, अशी अटकळ होती. मात्र, शिवसेनेने सवतासुभा मांडल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. शिवसेना पदाधिकारी आक्रमक प्रचार करीत असून, दोन्ही काँग्रेससह भाजप आणि राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेला दोन्ही काँग्रेसनी कोल्हापुरात सर्वाधिक संधी दिल्याचा दावा करत सत्ताधारी आघाडी बाजू मांडत आहे. गडहिंग्लज येथे प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आता सत्ताधारी आघाडीने रोज दोन तालुक्यांत प्रचार मेळाव्यांचे आयोजन केले आहे. विरोधी आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ सोमवारपासून होत आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे नेते आक्रमकपणे भूमिका मांडतील. तसेच तालुक्यांतील राजकारणातून दोन्ही काँग्रेसवर जहरी टीका करण्याची संधी सोडणार नाहीत. यामुळे आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणूक गाजणार आहे.

Back to top button