कोल्हापूर : हनी ट्रॅप प्रकरणी खंडणीखोर एस.एम. टोळीवर ‘मोका’ | पुढारी

कोल्हापूर : हनी ट्रॅप प्रकरणी खंडणीखोर एस.एम. टोळीवर ‘मोका’

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : हनी ट्रॅप मध्ये गुंतवून बड्या व्यापारी, व्यावसायिकांसह कॉलेज तरुणांना ब्लॅकमेल करून लाखो रुपयांची खंडणी उकळणार्‍या कुख्यात एस.एम. टोळीचा म्होरक्या सागर पांडुरंग माने, विजय रामचंद्र गौंड (रा. कळंबा) यांच्यासह 8 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत शुक्रवारी कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली.

हनी ट्रॅपप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने बेड्या ठोकलेल्या आणखी एका टोळीवर लवकरच ‘मोकां’तर्गत कारवाई शक्य असल्याचे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले. एकाचवेळी दोन्ही टोळ्यांच्या म्होरक्यांसह साथीदारांवर कारवाई झाल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. टोळीतील एका अल्पवयीन मुलावरही कारवाई करण्यात आली आहे.

‘मोकां’तर्गत कारवाई झालेल्यांत सागर माने (रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा), विजय रामचंद्र गौंड (राम गल्ली, कळंबा), सोहेल ऊर्फ अरबाज मुनाफ वाटंगी (जुना वाशी नाका, शिवाजी पेठ), उमेश श्रीमंत साळुंखे, आकाश मारुती माळी, सौरभ गणेश चांदणे (तिघेही रा. यादवनगर), लुकमान शकिल सोलापुरे (सरनाईक वसाहत, जवाहरनगर) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, बेकायदा प्राणघातक शस्त्रे कब्जात बाळगून दहशत माजविणे यासारख्या 28 गुन्ह्यांचा समावेश असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. यापैकी उमेश साळुंखे, सोहेल वाटंगी, लुकमान सोलापुरे, सौरभ चांदणे यांना अटक करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

अल्पवयीन मुलीचा वापर करून एका बड्या व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आले. अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता.

Back to top button