कोल्हापूर : ‘स्वॅब’ टार्गेटसाठी जबरदस्तीने ‘कलेक्शन’ | पुढारी

कोल्हापूर : ‘स्वॅब’ टार्गेटसाठी जबरदस्तीने ‘कलेक्शन’

कोल्हापूर; सतीश सरीकर : स्वॅब टार्गेटसाठी जबरदस्तीने कलेक्शन केले जात आहे. कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त स्वॅब टेस्ट केल्या जात आहेत. परंतु स्वॅबसाठी नागरिकांवर सरसकट जबरदस्ती करण्यात येत आहे.

काहीच लक्षणे नसतानाही नागरिकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. नागरिकांच्या विरोधानंतरही महापालिका आरोग्य विभागातील नर्सिंग स्टाफ स्वॅब घेत आहेत. याविषयी आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांकडून माहिती घेतली असता प्रशासनाने स्वॅबसाठी दररोजचे टार्गेट दिल्याचे सांगण्यात आले.

स्वॅब

परिणामी केवळ प्रशासनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आजारी नसतानाही धडधाकट नागरिकांचे स्वॅब कलेक्शन केले जात आहे. अशाप्रकारे महापालिका प्रशासनाचा अजब कारभार सुरू आहे. काही ठिकाणी ‘पोलिसांना आणू…’ अशीही धमकी दिली जात आहे. कोल्हापूर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी दाखविण्यासाठी विनाकारण जास्तीत जास्त नागरिकांचे स्वॅब तपासले जात असल्याची चर्चा आहे.

पंचगंगा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील नर्स व इतर स्टाफ शनिवारी गंगावेसमध्ये गेला होता. ऋणमुक्तेश्वर गल्लीतील एका कुटुंबात जाऊन स्वॅब टेस्ट करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु संबंधित कुटुंबीयांनी आपल्या कुटुंबात कोणीही आजारी नसल्याचे स्पष्ट केले.

तरीही संबंधित नर्स व स्टाफने यापूर्वी तुम्ही पॉझिटिव्ह होता. त्यामुळे तुम्हाला स्वॅब द्यावाच लागेल, असे ठणकावले. अडीच महिन्यापूर्वी कोरोना झाला असल्याने आणि आता प्रकृती ठणठणीत असल्याने स्वॅब देणार नाही, असा पवित्रा संबंधित कुटुंबाने घेतला. तरीही त्या कुटुंबातील पुरुषाचा जबरदस्तीने स्वॅब घेण्यात आला.

इतरही ज्येष्ठ महिलांचा स्वॅब घेण्याचा प्रयत्न नर्सिंग स्टाफने केला. परंतु त्या कुटुंबातील महिला बाहेर आल्या नाहीत. त्यानंतर समोरील घरातही नर्सिंग स्टाफ गेला. त्या कुटुंबातील स्वॅब घेण्यासाठी जात असताना तेथे वादावादी झाली. संबंधित कुटुंबातील व्यक्तीने मीसुद्धा आरोग्य विभागाशी संबंधित काम करतो, असे सांगितल्यानंतर तेथून नर्सिंग स्टाफ बाहेर पडला.

पुढे आणखी एका कुटुंबाकडे गेल्यावर त्यांनी कालच लस घेतेवेळी अँटिजेन टेस्ट केल्याचे सांगितले. काही कुटुंबांना पोलिस आणून स्वॅब घेऊ, अशी भीतीही घातली जात होती. परिणामी विनाकारण वेठीस धरण्यात येत असल्याबद्दल वादावादीच्या घटना घडत आहेत.

कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. वेगवेगळे उपक्रम राबवून काही अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. परंतु काही अधिकारी-कर्मचार्‍यांच्या आडमुठ्या धोरणामुळे महापालिका बदनाम होत चालली आहे.

महापालिका प्रशासनाने कोरोनाला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांच्या स्वॅब टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आजारी किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्यांचे स्वॅब घेण्याची गरज आहे. सद्य:स्थितीतही महापालिकेच्या शहरातील विविध 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांवरील स्वॅब दुसर्‍या दिवशी तपासणीसाठी जातात. त्यानंतर चार दिवसांनी त्या स्वॅबचा अहवाल येतो. या कालावधीत संबंधित व्यक्ती सगळ्या गावभर फिरत असते.

महापालिकेच्या अनेक अधिकार्‍यांनी स्वॅब टेस्टला दिल्यावर किती दिवसांनी अहवाल येतो याचा अनुभव घेतला आहे. त्यात अगोदर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

मनपाचा आंधळा कारभार अन् शहरवासीयांना होतो मन:स्ताप!

ऋणमुक्तेश्वरमधील एका तरुणाला अडीच महिन्यांपूर्वी ताप आला होता. संबंधित तरुणाने अँटिजेन टेस्ट केली असता पॉझिटिव्ह आला. पुन्हा पंचगंगा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आरटीपीसीआर टेस्ट केली. त्याचा अहवाल दिला नाही. संबंधित तरुण व त्यांचे कुटुंबीय पंधरा डॉक्टरांच्या निगराणीखाली होम क्वारंटाईन झाले. संबंधित रुग्ण ठणणठीत बरा झाल्यानंतर तब्बल महिन्याने पंचगंगा रुग्णालयातून तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, तुम्ही कुठेही बाहेर फिरू नका… असा फोन आला. संबंधित तरुण अवाक् झाला. अशाप्रकारे महापालिका आरोग्य विभागाचा आंधळा कारभार सुरू आहे. शहरवासीयांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

दोन डोस घेतलेल्यांचेही स्वॅब

अनेक नागरिकांनी लसीचे एक किंवा दोन डोस घेतलेले आहेत. दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना राज्य शासन कुठेही फिरण्यास मुभा देत आहे. कोल्हापूर शहरात मात्र दोन डोस घेतले असलेल्यांचेही स्वॅब जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना वेठीस धरले जात आहे. आजारी नसताना आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसतानाही स्वॅब दिलाच पाहिजे, असा आग्रह धरला जात आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण असून तीव— संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button