

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधून भरपूर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 1 कोटी 40 लाख 51 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी रमेश नथू पटेल (वय 49, रा. जिव्हाजी भवनसमोर, कोल्हापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी काव्या त्रिपाटी, गॅलेक्सी एफएक्स ट्रेड कंपनीचे मालक संजय पटेल व त्यांच्या भागीदार अर्चना तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,या प्रकरणाचा तपास सायबर पोलिस ठाणे, कोल्हापूर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
फिर्यादी रमेश पटेल हे हार्डवेअर व्यापारी आहेत. तसेच ते एंजल ब्रोकिंगद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार आहेत. यातूनच काव्या त्रिपाटी या महिलेशी मोबाईलवरून संपर्क झाला. त्यावेळी आपण गॅलेक्सी एफएक्स या फॉरेन ट्रेड मार्केटिंग ब्रोकर कंपनीतून बोलत असल्याचे तिने सांगितले.
आमच्या कंपनीमार्फत अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळतो, असे आमिष तिने पटेल यांना दाखविले. त्यावेळी कंपनीतील डायमंड प्लॅन घेण्यास पटेल यांना भाग पाडले. त्यामध्ये गुंतवणुकीवर दिवसागणीक 7 ते 25 टक्क्यांपर्यंत फायदा मिळेल, असेही तिने सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पटेल यांनी पत्नी जसोदाबेन यांच्या बँक खात्यातून 50 हजार रुपये कंपनीच्या अधिपत्याखाली असलेल्या ट्रिनिटी एंटरप्रायजेस या कंपनीच्या बँक खात्यावर भरले. त्यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावर मिळणारा फायदा मिळण्यासाठी संशयितांनी पटेल यांना एक लिंक दिली. त्या लिंकद्वारे कंपनीचे अॅप मोबाईलवर डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानुसार पटेल यांनी अॅप डाऊनलोड केल्यानंतर गुंतवणूक रकमेवरील फायदा हा डॉलरमध्ये दिसू लागला. त्यानंतर कंपनीने पटेल यांच्याशी पुन्हा संपर्क केला. यावेळी पटेल यांना जास्त गुंतवणूक केल्यास जास्त फायदा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर पटेल यांनी आपल्या पत्नीच्या बँक खात्यावरील 1 कोटी 29 लाख रुपये त्या कंपनीत गुंतविले. मोठी रक्कम गुंतवणूक केल्यानंतर त्यावरील फायदा परत देण्याची मागणी पटेल यांनी केली.
त्यावेळी संशयित संजय पटेल व तिवारी यांनी 3 लाख 48 हजार 127 रुपये रमेश पटेल यांच्या बँक खात्यावर वळते केले. या व्यवहारातून संशयित आरोपींनी पटेल यांचा विश्वास संपादन केला. मात्र, त्यानंतर रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे 1 कोटी 40 लाख 51 हजार 873 रुपयांची आपली फसवणूक झाल्याची तक्रार पटेल यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिली.
दरम्यान, हा आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने व फसवणुकीचा आकडा मोठा असल्याने अधिक तपासासाठी हा गुन्हा कोल्हापुरातील सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.