बनावट कागदपत्राद्वारे समाईक मिळकतीवर 9.99 कोटींचे कर्ज

file photo
file photo

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी अर्बन बँकेचा बोजा नसल्याचा बनावट सहीचा दाखला, कर्जासाठी बनावट सर्च रिपोर्ट तसेच नगरपालिकेचा बनावट बांधकाम परवाना तयार करून समाईक मिळकतीवर 9 कोटी 99 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज काढून सख्ख्या भावाची फसवणूक केल्याप्रकरणी शीतल आदिनाथ केटकाळे व सौ. वैशाली शीतल केटकाळे (दोघे रा. नमोकार बिल्डिंग कोल्हापूर रोड) या दाम्पत्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद अजितकुमार आदिनाथ ऊर्फ आदिशा केटकाळे (वय 57, रा. इचलकरंजी) यांनी दिली आहे. शीतल केटकाळे यास अटक केली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावाली. याबाबतची माहिती अशी, शीतल केटकाळे यांनी लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सन्मती प्रिसिजन इंजिनिअरींग या फर्मवर वेगवेगळी अशी 9 कोटी 99 लाख 90 हजार रुपयांची तीन कर्जे काढली आहेत.

या कर्जाच्या मंजुरीसाठी शीतल यांनी भाऊ अजितकुमार, वडील आदिनाथ आणि स्वत:च्या नावे सामाईक असलेले महापालिका हद्दीतील गट क्र. 164 मधील प्लॉट नंबर 1, 2 व 3 हे तारण ठेवले आहेत. या प्लॉटवर इचलकरंजी अर्बन बँकेचा बोजा असताना शीतल यांनी बनावट नाहरकत दाखला तयार करून त्यावर बँकेचा बनावट शिक्का व मॅनेजरची बनावट सही करून कोणताही बोजा नसल्याचे व हस्तांतरास योग्य असल्याचे बनावट पत्र तयार करून त्याचा वापर बनावट बक्षीसपत्र तयार करण्यासाठी केला. तसेच आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या काही कर्मचार्‍यांशी संगनमत केले व बँकेच्या सर्च रिपोर्टमध्ये प्लॉट नंबर 1, 2, 3 हे प्लॉट 1985 सालच्या प्रोव्हिजन लेआऊट (सुधारित रेखांकन) मध्ये ते शीतल यांच्या नावे असल्याचा बनावट रिपोर्ट तयार करून घेतला.

राहत्या घराच्या पहिल्या मजल्याचा बांधकाम परवाना शीतल यांच्या नावे असल्याचे दाखविण्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेचा बनावट बांधकाम परवाना तयार करून त्यावर नगरपालिकेचा बनावट शिक्का व मुख्याधिकारी यांची स्वाक्षरी करून बनावट परवाना तयार केला. याद्वारे संशयित शीतल केटकाळे व वैशाली केटकाळे यांनी सामाईक मिळकतीवर कर्ज काढून ती लुबाडण्याच्या उद्देशाने संगनमताने फसवणूक केल्याबाबतचा तक्रारी अर्ज अजितकुमार केटकाळे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे दाखल केला होता. या अर्जाची चौकशी करून अहवाल उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यामार्फत अप्पर पोलिस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्याची जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिल्याने परवानगी पोलिसांनी दोघाही संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक राजू ताशिलतदार करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news