सतेज पाटील म्हणाले, सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करा | पुढारी

सतेज पाटील म्हणाले, सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : सायबर गुन्ह्यांत वाढ होत आहे. ठेवींच्या संरक्षणासाठी बँकांनी तंत्रज्ञान सुधारणा करण्याबरोबरच ठेवीदारांत सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

अग्रणी जिल्हा कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय सल्‍लागार समितीची बैठक सोमवारी ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. नाबार्डद्वारे तयार केलेल्या संभाव्य वित्त आराखड्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या पुस्तिकेमुळे जिल्हा अग्रणी बँकेला जिल्ह्याची वार्षिक पतपुरवठा योजना तयार करण्यास गती मिळेल, असे मत मंत्री सतेज पाटील यांनी व्यक्‍त केले.

ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व बँकांनी ‘पंतप्रधान’, ‘मुख्यमंत्री’ रोजगारनिर्मिती योजना आदीसह अन्य योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा. याकरीता शिबिराचे आयोजन करा. काही खासगी बँका नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देत नसल्याचे आढळून आल्याबद्दल त्यांनी बैठकीत नाराजी व्यक्‍त केली.

जिल्ह्यातील आजरा, गगनबावडा, चंदगड, गडहिंग्लज, शाहुवाडी, भूदरगड, राधानगरी या दुर्गम तालुक्यात बचत गट, नोंदणीकृत शेतकरी उत्पादक गट तसेच संयुक्‍त जबाबदारी गट निर्माण करा. त्यातून या भागाचा विकास साधता येईल. गायी-म्हैशींसाठी घेतलेल्या बँक कर्जावरील विम्याच्या हप्त्याची रक्‍कम कमी व्हावी, अशी मागणी बँक प्रतिनिधींनी केली. त्याबाबत प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी सांगितले.

आ. प्रकाश आवाडे म्हणाले, बँकांनी उद्योग व कृषी क्षेत्रासाठी प्राधान्याने कर्ज पुरवठा करावा. तसेच बचत गटांना व्याज परतावा योजनेचा लाभ मिळवून द्यावा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्यात सप्टेंबर अखेर पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत 11 लाख 83 हजार 984 खाती उघडण्यात आली. 8 लाख 59 हजार 695 खात्यात रू-पे कार्ड प्रदान दिली आहेत.

प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 6 लाख 18 हजार 977 खाती, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत 2 लाख 27 हजार 229, अटल विमा योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये 8 हजार 581 खाती उघडली आहेत. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजने अंतर्गत सप्टेंबर अखेर 53 हजार 540 लोकांना 511 कोटीचे अर्थसहाय्य केले आहे.

सप्टेंबर अखेर 1475 कोटीचे वाटप

जिल्ह्याकरीता पीक कर्जाचे वार्षिक उद्दिष्ट 2,720 कोटी रुपये होते. त्यापैकी खरीप हंगामाकरिता 1,360 कोटी उद्दिष्ट होते. सप्टेंबर अखेर 1,475 कोटी रुपये वाटप झाले आहे. खरीप हंगामासाठी 108 टक्के उद्दिष्ट पूर्तता झाली असून रब्बी हंगामाचे देखील उद्दीष्ट लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक हेमंत खेर, भारतीय रिझर्व बँकेचे आर्थिक समावेशनचे व्यवस्थापक विश्वजीत करंजकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवी शिवदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्‍त याहया खान पठाण, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक आशुतोष जाधव, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने प्रमुख उपस्थित होते.

पथविक्रेत्यांना कर्जवाटपाचे काम प्रगतिपथावर

अग्रणी जिल्हा प्रबंधक गणेश शिंदे म्हणाले, प्राथमिक क्षेत्रासाठी 10 हजार 210 कोटी रुपयांचा जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठ्याचा आराखडा तयार केला आहे. शेती, शेतीपूरक क्षेत्रासाठी 4,941.57 कोटी, सूक्ष्म/लघू/मध्यम उद्योगांसाठी 4,070.38 कोटी आणि इतर प्राथमिक क्षेत्रांसाठी 1,713.04 कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत.

सप्टेंबरअखेर जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टापैकी 4,934 कोटी (48 टक्के वार्षिक) रुपये इतकी उद्दिष्ट पूर्तता झाली आहे. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत जिल्ह्यात पथविक्रेत्यांना कर्जवाटपाचे काम प्रगतिपथावर असून, आजअखेर 9,788 अर्ज मंजूर करून आतापर्यंत 9,326 खात्यांमध्ये 9.33 कोटी रुपये रक्‍कम वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.

1. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ द्या
2. जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करा
3. दुर्गम भागाच्या विकासासाठी प्रयत्न करा
4. जिल्ह्याचा 10,210 कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा

Back to top button