कोल्हापूरातील पारा 14 अंशावर घसरला | पुढारी

कोल्हापूरातील पारा 14 अंशावर घसरला

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : यंदा उशिरा का असेना, कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठला आहे. गेला संपूर्ण महिना थंडी, कडक ऊन, मुसळधार पाऊस अशा संमिश्र वातावरणात गेला. दरम्यान, अवकाळी पावसामुळे यंदाच्या वर्षी लांबणीवर पडलेल्या थंडीचा कडाका जिल्ह्यात चार दिवसांत वाढला आहे. घसरलेल्या पार्‍यामुळे हुडहुडी भरली आहे. सरासरी चार ते पाच अंशांनी पारा घसरून रविवारी 14 अंशावर पोहोचला.

दरवर्षी दिवाळी दरम्यान जाणवणारी थंडी यंदाच्या वर्षी थोडी उशिराने दाखल झाली. संपूर्ण नोव्हेंबर महिना ऊन-पावसाच्या खेळात गेला. महिनाभरात अनेक वेळा मुसळधार पावसाने झोडपून काढले. आता मात्र चार दिवसांपासून पार्‍यात घसरण होऊन थंडी वाढत आहे. पुढील काही दिवस आणखी पारा घसरणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेल्या 48 तासांत जिल्ह्यातील तापमानात जवळपास चार ते पाच अंश सेल्सिअसने घसरण झाली आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला तापमानात किमान तीन अंशांची घसरण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला होता. परंतु याच दरम्यान दोन ते तीन वेळा तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बदल झाला. आता थंडीला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यातील चढ-उतार गृहीत धरले तरी थंडीचा रंग काही वेगळाच असतो. शहरी भागासाठी तो गुलाबी थंडीचा अनुभव असला तरी ग्रामीण भागात मात्र गहू, हरभर्‍यापासून ते आंब्यापर्यंतच्या पिकांचे भवितव्य थंडीवर अवलंबून असते. त्यामुळे मुसळधार पावसानंतर येणार्‍या थंडीचे पिकावर काय परिणाम होतात याची धास्ती शेतकर्‍यांना लागली आहे.

आल्हाददायक वातावरण

जिल्ह्यात रविवारी कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14.7 अंश सेल्सिअस इतके होते. सायंकाळनंतर थंडीचा जोर वाढत आहे. ग्रामीण भागात तर हुडहुडी भरणारी थंडी आहे. त्यामुळे शेकोट्या पेटवलेल्या दिसत आहेत; तर दिवसभर थंड वार्‍यामुळे आल्हाददायक वातावरणाचा अनुभव येत आहे.

Back to top button