कोल्हापूर : गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स बँकेसाठी चुरशीने 44 टक्के मतदान | पुढारी

कोल्हापूर : गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स बँकेसाठी चुरशीने 44 टक्के मतदान

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-ऑप. बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने 44.45 टक्के मतदान झाले. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल आणि महाराष्ट्र हायस्कूलसह पाच ठिकाणी 52 केंद्रांवर हे मतदान घेण्यात आले. 20 हजार 400 पैकी 9 हजार 241 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.

दरम्यान, रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मंगळवारी (दि.21) मतमोजणी होणार असून, सभासदांना निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

राज्यातील सात जिल्ह्यांत शाखा असलेल्या या बँकेच्या 15 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. दहा वाजेपर्यंत 4 टक्केच मतदान झाले. दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले. दुपारी दोन वाजता 30 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मात्र गती कमी झाली. सायंकाळी पाचपर्यंत 44.45 टक्केच मतदान झाले. मतदारांना आणण्यासाठी सत्तारूढ व विरोधी परिवर्तन पॅनेलकडून मोठी चुरस दिसत होती.

‘पाटबंधारे’चे 16 उमेदवार

सर्वात जास्त पाटबंधारे विभागातील सुमारे चार हजार कर्मचारी राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-ऑप. बँकेचे सभासद आहेत. त्यामुळे या विभागातील इच्छुकांची संख्या मोठी होती; पण सत्तारूढ आणि परिवर्तन या पॅनेलमध्ये संधी न मिळाल्याने तिसरे पॅनेल स्थापन झाले. या तिन्ही पॅनेलमधून एकट्या पाटबंधारे विभागाचे 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वात जास्त आठ उमेदवार युवा आघाडीत आहेत.

यावेळी तरुणांपेक्षा सेवानिवृत्त कर्मचारीच मतदानासाठी बाहेर पडले होते. हे मतदार आमच्या बँकेतील कामावर खूश आहे. त्यामुळे त्यांची मते आम्हालाच मिळणार, असा दावा करत सत्तारूढ गटाने केंद्राबाहेर आल्यानंतर कपाळाला गुलाल लावून विजयाच्या घोषणा दिल्या. सत्तारूढ गटाचा विजय निश्‍चित आहे, असे पॅनेलप्रमुख रवींद्र पंदारे व एम. एस. पाटील यांनी सांगितले.

परिवर्तन पॅनेलकडूनही विजयाचा दावा

जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मतदार आणले, तसेच सत्तारूढ गटातील कारभार्‍यांच्या कामावर सेवानिवृत्त कर्मचारी, सभासदांतून नाराजी आहे. याचा फायदा निश्‍चितपणे परिवर्तन पॅनेलला होणार असल्याने आमचे पॅनेल मोठ्या मताधिक्यांनी विजयी होईल, असा दावा पॅनेलप्रमुख बाळासाहेब घुणकीकर व प्रकाश पाटील यांनी केला आहे.

प्रथम सर्वसाधारण गटाची मोजणी

रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये मंगळवारी (दि.21) मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. मतपत्रिकांची जुळवाजुळव झाल्यानंतर प्रथम सर्वसाधारण गटातील मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर राखीव गटाच्या मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत. सायंकाळी सहापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया संपेल, असे नियोजन केल्याची माहिती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.

मतदान केंद्रावर दोन गटांत बाचाबाची

तिन्ही पॅनेलचे उमेदवार पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्य गेटवर थांबून होते. मतदानासाठी जाणार्‍या मतदारांना कोण विमान, कोण रोडरोलर तर कोण नारळ म्हणत होते. यातून गेटवर मोठी आरडाओरड सुरू होती. यातून सत्तारूढ आणि युवा आघाडीतील उमेदवारांत जोरदार बाचाबाची झाली. याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे पोलिस कुमक घेऊन आले. त्यांनी गेटवरील सर्वांना पिटाळून लावत दंगा केल्यास गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर वातावरण शांत झाले.

Back to top button