कोल्हापूर जिल्हा बॅंक : माघारीसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बॅंक : माघारीसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (District Bank Election) निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले आहेत. माघारीचा दिवस 24 तासांवर आला तरी अपेक्षित माघार झालेली नाही. त्यामुळे रविवारी माघारीसाठी जोरदार हालचाली झाल्या. तसेच दिवसभरात माघारीच्या अर्जावर कार्यकर्त्यांच्या सह्या घेण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू होती.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक (District Bank Election) जाहीर झाल्यापासून ती बिनविरोध करण्याच्यादृष्टीने प्रमुख नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु; इच्छुकांची संख्या वाढू लागली, त्यातच सोबत घेतलेले पक्षदेखील जादा जागांची मागणी करू लागले. नव्याने स्थापन झालेल्या पक्षाचे नेते बँकेतील सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारीसाठी विरोध करू लागले, यामुळे नेत्यांनी प्रथम तालुक्यातून आपल्या निवडी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात बर्‍याच नेत्यांना यश आले आहे.

काही तालुक्यांत वाद आहेत. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. मार्ग नाही निघाला तर मैत्रीपूर्ण लढती होतील. आता उरलेल्या नऊ गटांतील निवडी बिनविरोध करण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे.

कार्यकर्त्यांच्या माघारीसाठी नेत्यांच्या जोरदार हालचाली झाल्या. नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना माघारीसाठी निरोप धाडून माघारीच्या अर्जावर सह्या घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु; काही कार्यकर्ते ऐकण्यास तयार नाहीत. त्यांना आगामी बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेतकरी संघ या सहकारी संस्थांमध्ये स्थान देण्याचा ‘शब्द’ नेत्यांना द्यावा लागत आहे.

इच्छुकांची संख्या पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेच अधिक आहे. कार्यकर्त्यांबरोबरच आघाडीतील अन्य पक्षांतील नेत्यांचाही त्यांना ‘शब्द’ पाळावा लागत आहेत. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातूनही जास्तीत जास्त माघारी घेण्यासाठी रविवारी दिवसभर त्यांची धावपळ सुरू होती.

सत्तारूढ पॅनेलच्या रचनेकडे लक्ष (District Bank Election)

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी माघारीची अंतिम घटका समीप आली आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्तारूढ आघाडीकडून सोमवारी (दि.20) पॅनेलची घोषणा होणार आहे, तर जागा वाटपावरून नाराज शिवसेनेने विरोधी आघाडीच्या माध्यमातून रणांगणात उतरण्याचे ठरवले आहे. सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलची रचना कशी असणार? विरोधी आघाडी घडणार की बिघडणार? याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत सर्वपक्षीयांनी दिल्यानेच उमेदवारांची मांदियाळी आहे. यंदाच्या निवडणुकीत 21 पैकी 20 जागांसाठी तब्बल 226 उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या आठ दिवसांत फक्‍त सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघारीसाठी शेवटचे दोनच दिवस बाकी आहेत. जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकर्‍यांची बँक म्हणून सर्वांनी एकत्र यावे यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेतेमंडळींचा प्रयत्न सुरू आहे. संस्था गटात शिरकाव तसेच इतर नऊ गटांत वाढीव जागा मिळवण्यासाठी घटक पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर घडणार्‍या घडामोडी लक्षवेधी ठरत आहेत.

सत्तारूढ आघाडीकडून सर्वपक्षीय नेत्यांच्या सहमतीने पॅनेलची घोषणा सोमवारी होईल. सत्तारूढ आघाडीने शिवसेनेला दोन जागा देऊ केल्याने नाराजी आहे. शिवसेनेने विरोधी पॅनेल करण्याची घोषणा केली आहे. पडद्यामागे जोरदार घडामोडी सुरू असून, विरोधी पॅनेल होणार काय? इतर आणखी कोणते घटक पक्ष या आघाडीत सहभागी होणार? शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सत्ताधारी आघाडी झुकते मात देऊन आणकी किती जागा वाढवून देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विक्रमी 275 उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत यंदाच्या वर्षी 275 इतक्या विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मागील आठवड्यात कासव गतीने सुरू असलेली माघार प्रक्रिया सोमवार आणि मंगळवारी या शेवटच्या दिवशी गती घेणार आहे. अजूनही रिंगणात 220 उमेदवार असून यातील सुमारे 150 उमेदवारांची माघार पुढील दोन दिवसांत होणार असल्याने अक्षरश: झुंबड उडेल, असा अंदाज आहे.

जिल्हा बँकेच्या 21 संचालकपदांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी 29 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. 3 डिसेंबरपर्यंत 275 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 6 डिसेंबरला अर्जांची छाननी झाली. छाननीनंतर 226 उमेदवार रिंगणात होते. माघारीसाठी 7 डिसेंबरपासून सुरुवात झाली. आतापर्यंत फक्‍त सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे.

21 डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. नेत्यांनी सर्व इच्छुकांना अर्ज भरण्याची मुभा दिल्याने विक्रमी संख्येने इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. सोमवारी दुपारी बारा वाजल्यानंतर सत्तारूढ पॅनेलची घोषणा होईल. तसेच विरोधी आघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर माघारीसाठी गती येणार आहे.

Back to top button