डॉ. शेखर भोजराज म्हणाले, ४५ मिनिटे चाला, कणा शाबूत ठेवा | पुढारी

डॉ. शेखर भोजराज म्हणाले, ४५ मिनिटे चाला, कणा शाबूत ठेवा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दहा वर्षांत मणका, कंबर, पाठ आणि मानदुखी आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हीच मणका दुखी आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. मणक्याचे आजार भविष्यात गुंतागुंत निर्माण करतात. हे टाळण्यासाठी दररोज 45 मिनिटे चाला अन् कणा शाबूत ठेवा, असा मूलमंत्र जगविख्यात स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांनी कोल्हापूरकरांना शनिवारी दिला. ‘पाठीचा कणा कसा सांभाळाल?’ या विषयावर ते बोलत होते.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे दै. ‘पुढारी’ आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्‍त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास दै. ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश मुदगल, दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सहायक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. भोजराज म्हणाले, वेदनाशामक औषध घेऊन मणक्याच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका.औषधापेक्षा आजाराचे निदान महत्त्वाचे आहे. नागरिकांचा डिजिटल मीडियावर विश्‍वास वाढला आहे. तरुण तर गॅझेट फेंडली झाले आहेत. त्याद्वारे मिळालेल्या अर्धवट माहितीद्वारे ते स्वतःवर इलाज करतात. हे शरीराला घातक ठरून गुंतागुंत वाढू शकते. गेल्या 10 वर्षांतील सर्व्हेमध्ये मणक्याचे आजार वाढल्याचे दिसून आले आहे. यामध्ये शेतकरी, ऑफिसमधील कर्मचारी, रोजंदारी कामगार, तरुणांसह लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. मणका हा मानवी शरीराचा विशेष अवयव आहे. तो ताठ आणि लवचिक असणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण संपूर्ण शरीराचा तोल आणि भार त्याच्यावर अवलंबून आहे. इतकेच काय, मणका मेंदूकडून शरीराच्या अन्य अवयवांकडे जाणार्‍या नसांचे संरक्षण करतो. काही कारणांनी मणक्याची झीज, मार लागला किंवा गाठीचा अडथळा निर्माण झाला तर विविध प्रकारच्या व्याधी उद्भवतात. यामध्ये अनेक वेळा मणक्याजवळील स्नायूला पॅरालेसिस होऊन मणका लुळा पडतो.

तपासणी दरम्यान ‘स्पॉन्डिलाईसिस’चे निदान होते. अशा वेळी अनेक रुग्ण घाबरून जातात. पण घाबरण्याचे कारण नाही. कारण वयोमानानुसार मणक्याची होणारी झीज होणे स्वाभाविक आहे. 80 टक्के मणक्याचे आजार वेळेत निदान आणि उपचार केल्याने बरे होतात. 15 टक्के रुग्णांमध्ये मणक्याच्या आजाराची गंभीर लक्षणे असतात. त्यासाठी काही दिवस वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात; तर इतर 5 टक्के रुग्णांवर शस्त्रक्रिया करून मणक्याची व्याधी दूर करावी लागते, असेही डॉ. भोजराज यांनी सांगितले.

स्लिपडिस्कच्या 80 टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज नाही ः डॉ. भोजराज

डॉ. भोजराज म्हणाले, मणक्याच्या आजाराला शरीरातील अन्य व्याधी कारणीभूत असू शकतात. त्यापैकी क्षयरोग (स्पायनल ट्युबर क्युलोसिस), कॅन्सर (स्पायनल ट्युमर) याकडे दुर्लक्ष करू नका. औषधे, शस्त्रक्रिया करून त्यांवर नियंत्रण शक्य आहे. अतिरिक्‍त व्यायाम, अतिरिक्‍त वजन उचलल्यामुळे स्लिपडिस्क आजार उद्भवतो. या आजाराचे प्रमाण हल्‍ली तरुणांमध्ये प्रकर्षाने वाढल्याचे दिसून येते. या आजाराचे 70 ते 80 टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते. औषधे, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम केल्याने तो बरा होतो.

व्याख्यानाचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील म्हणाले, गेल्या 18 वर्षांपासून दै. ‘पुढारी’ व डॉ. डी. वाय.पाटील हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिक्षण आणि आरोग्य प्रबोधन अशी आरोग्य व्याख्याने घेतली जात आहेत. मानसिक आरोग्य चांगले ठेवल्यास निरोगी जगण्यास मदत होते. त्यासाठी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, चेअरमन डॉ. योगेश जाधव, पालकमंत्री सतेज पाटील, डॉ. संजय डी. पाटील यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. कला, क्रीडा, कृषी, सामाजिक, राजकीय, आरोग्य, शैक्षणिक, अर्थकारण, साहित्य यांसह सर्वच क्षेत्रांवर दै. ‘पुढारी’चे चौफेर लेखन आहे. त्यामुळे दै. ‘पुढारी’ हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. लाखो वाचकांच्या मनावर ‘पुढारी’ने अधिराज्य गाजवल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. भोजराज व डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश मुदगल यांचे पुष्पगुच्छ देऊन दै. ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून व्याख्यानाचे उद्घाटन झाले.

गर्भवती महिलांनी वजन नियंत्रणात ठेवावे

गर्भवती महिलांचे वजन प्रसूती काळात आणि प्रसूतीनंतर वाढते. वाढलेले वजन प्रसूतीनंतर जास्तीत जास्त सहा आठवड्यांत कमी करावे. तसेच वजन नियंत्रणात ठेवावे, जेणेकरून भविष्यात मणका आणि पाठीचे विकार दूर ठेवता येतील.
स्वागताने डॉ. भोजराज भारावले

जगविख्यात स्पाईन सर्जन डॉ.शेखर भोजराज यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. डॉ. भोजराज सभागृहातूनच व्यासपीठावर आले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. यावर बोलताना डॉ. भोजराज म्हणाले, मला इतक्या वेळा कोल्हापूरला येण्याचा योग आला. पण आजचे माझे येणे विशेष आहे. कोल्हापुरी स्वागताने आपण भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.

काही न करता मणक्याचा त्रास

अनेक नागरिकांना कोणताही त्रास नसताना अचानक मणक्याचा त्रास सुरू होतो. मणक्यामध्ये गॅप निर्माण होऊन वेदना होतात. काही वेळा मणक्यातील जॉईंट मुरगळतात, गादी सरकते. अशा वेळी गोंधळून अथवा घाबरून जाण्याचे कारण नाही. तज्ज्ञांचा सल्‍ला आणि औषधोपचारांनी हा त्रास कमी होतो.

उत्तम वक्‍तृत्वशैलीमुळे सभागृहात शांतता

डॉ. भोजराज यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत दैनंदिन व्यवहारातील उदाहरणांसह मान, पाठीच्या कण व कंबर यांची माहिती दिली. व्याख्यानाच्या शेवटपर्यंत आणि प्र्रश्‍नोत्तरे होईपर्यंत सभागृहात शांत होते.

Back to top button