कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन : वन्यप्राण्यांच्या मानवी वस्तीतील वावरावरील उपाययोजनांचा प्रस्ताव वनविभागाने तात्काळ सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केल्या. कोल्हापूर शहर परिसरातील मानवी वस्तीत गव्याचा वावरल्याच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, उपवनसंरक्षक रावसाहेब काळे, करवीरचे वन परीक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गव्याच्या हल्ल्यात जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे दुर्घटना घडू नये व मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. रान हत्तींसाठी कॉलर आयडी बसविण्याबाबत ओरिसा राज्याच्या वनविभागाकडून माहिती घ्यावी, अशा सूचना देवून अशा उपाययोजनांमुळे रानहत्ती व मानव संघर्ष कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
उपवनसंरक्षक रावसाहेब काळे म्हणाले, पन्हाळा तालुक्यातील कळे येथे दलदलीत अडकलेल्या जखमी झालेल्या एका गव्याचा मृत्यू झाला असून कोल्हापूर शहर परिसरात दोन रानगवे आढळून आले होते. हे गवे पुन्हा त्यांच्या अधिवासात परत गेले आहेत. वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्याचे आढळल्यास अथवा वनविभागाशी संबंधित काही माहिती हवी असल्यास यासाठी 'हॅलो फॉरेस्ट 1926' या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक रावसाहेब काळे यांनी केले आहे.