गव्याचा कोल्हापूर शहरात ‘मॉर्निंग वॉक’ | पुढारी

गव्याचा कोल्हापूर शहरात ‘मॉर्निंग वॉक’

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गुरुवारी पहाटे गव्याने ( bison ) कोल्हापूर शहरात ‘मॉर्निंग वॉक’ केला. पहाटे दोन ते चार असा सुमारे दोन तास त्याचा रस्त्यांवरून ‘ऐटबाज’ फेरफटका सुरू होता. गवा पुढे आणि त्यामागे यंत्रणा, अशी जणू वरातच शहरात पहाटे सुरू होती. गेल्या सात दिवसांपासून कोल्हापूर आणि परिसरात गव्यांचा वावर सुरू आहे. गेले सहा दिवस एकाच गव्यावर लक्ष केंद्रित केले असतानाच, गुरुवारी पहाटे शहरातील रस्त्यांवर लहान गव्याचे दर्शन झाले. यामुळे हा नवीन गवा असल्याचे स्पष्ट झाले.

बुधवारी कसबा बावडा-कदमवाडी या परिसरात आढळलेल्या या गव्याचे ( bison ) गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास पितळी गणपतीजवळ दर्शन झाले. बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहतमार्गे तो आला. पितळी गणपतीकडून तो पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे गेला. त्या चौकातून तो परत पितळी गणपतीजवळ आला. तेथून तो आरटीओ कार्यालयासमोरून विवेकानंद महाविद्यालयासमोर आला. त्याची माहिती स्थानिकांनी शाहूपुरी पोलिसांना दिली.

पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ही माहिती दिल्यानंतर वन विभागासह पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक या गव्याच्या ( bison ) मागावर होते.

दरम्यान, गव्याने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयापासून गव्याच्या ( bison ) मागे वन विभागाचे कर्मचारी, पोलिस, अग्निशमन दलाचे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे जवान होते. जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या रस्त्याने गवा कनाननगरच्या दिशेने गेला. तेथून तो उमेदपुरीतून महावीर उद्यानासमोर आला. भालजी पेंढारकर केंद्रासमोरून तो थेट जयंती नाल्यावर आला. त्यानंतर गव्याने सीपीआर चौक गाठला. ठिकठिकाणी बंदोबस्त लावून त्याला दिशा देत पंचगंगेच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होता.

सीपीआर चौकातून तो तोरस्कर चौकाच्या दिशेने निघाला. हा मार्गही त्याला रिकामा करून देण्यात येत होता. वर्दळ वाढण्यापूर्वी गवा पंचगंगा नदीपलीकडे जाईल, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, गवा सिद्धार्थनगरच्या कमानीजवळ आला. तेथून तो उजव्या बाजूला ओढ्याच्या दिशेने शेतात निघून गेला.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरून हा गवा रुबाबात चालत होता. जणू त्याचा शहरातील रस्त्यांवरून मॉर्निंग वॉकच सुरू होता. प्रारंभी काहींनी त्याचे चित्रीकरण केले. ते व्हायरलही झाले. नंतर मात्र वन आणि पोलिस विभागाने गव्याचा मार्ग रिकामा राहील, याचीच दक्षता घेतली. यामुळे गवा ज्या रस्त्यावर होता, त्यावर कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. यामुळे पहाटे दोन ते चार वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवर गव्याचाच ‘वॉक’ सुरू होता.

Back to top button