काय बी करा, पार्टी झालीच पाहिजे! मित्रांच्या संगतीनं लेकराचा आईच्या दागिन्यांवर डल्ला! | पुढारी

काय बी करा, पार्टी झालीच पाहिजे! मित्रांच्या संगतीनं लेकराचा आईच्या दागिन्यांवर डल्ला!

कोल्हापूर : दिलीप भिसे

वय अवघं 13 वर्षांचं… सहावीला शिक्षण घेणारं कोवळं पोर… वडिलांच्या पश्चात मोलमजुरी करून माता कच्च्या-बच्च्यांना लहानचं मोठं करीत होती. अनंत अडचणींतून मार्गक्रमण करीत ती संसाराचा गाडा हाकत होती… पोरानं शिकावं… मोठं व्हावं… स्वत:च्या पायावर उभं राहावं… चारचौघांत त्यानं नाव रोशन करावं, ही रास्त अपेक्षा स्वाभाविक… मात्र चांगल्या-वाईट गुणांची पारख न झालेलं पोरग बालवयातच फसलं… मित्रांच्या संगतीला लागून भिंतीतल्या चोरकप्प्यात ठेवलेल्या 18 तोळे दागिन्यांवर पोटच्या गोळ्यानंच आईच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचं निष्पन्न झाल्यानंतर मातेची काय अवस्था झाली असेल?

उत्तरेश्वर पेठ इथं नुकत्याच घडलेल्या आणि मन सुन्न करणार्‍या अक्रित घटनेनं समाजघटकासह पालकवर्गाची चिंता वाढली आहे. झालंही त्याचं असं… ‘कोरोना’चं भूत मानगुटीवर बसल्याने समाजजीवनातील सार्‍याच उलाढाली जागच्या जागी थांबल्या. त्यात बालवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंतचे सर्वच दरवाजे दीड वर्षासाठी बंद झालेली होती. शंभर टक्के शाळाचं बंद राहिल्याने मुलांना ना अभ्यासाचा पत्ता… ना जेवणाची भ्रांत … सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत पोरं घराबाहेर मित्रांच्या संगतीत राहू लागली.

रिकामटेकडा तरीही रूबाब काहीसा औरच !

म्होरक्या तसा पोपटपंचीच होता… मोठमोठ्या बाता मारून शाळकरी मुलांवर भुरळ टाकायचा… पोरांना पण त्याचे नवल वाटायचे… त्याने कधीच शाळा सोडली होती… चार पैशाची कमाई नाही… रिकामटेकडाच तो… खिशात पैसे नसतानाही त्याचा रूबाब काही औरच… सहकारी मित्रांना विश्वासात घेवून त्याच्या घरातील आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला होता. सोनेनाणी, आईवडिलांनी कपाटात ठेवलेल्या रोकडचाही सुगावा लागला होता.

गोट्याला फितवून घरातील चोरीचा प्लॅन शिजविला

गोट्याने तर म्होरक्याला घरातील सारीच माहिती दिली होती. एवढेच नव्हे तर आईने चोरापासून संरक्षण करण्यासाठी स्वत:च्या अंगावरील 18 तोळे सोन्याचे दागिने घरातील भिंतीमधल्या चोरकप्प्यात लपवून ठेवल्याचे सांगून टाकले होते. म्होरक्याच्या तोंडाला पाणी सुटले होते. गोट्याचे घर मध्यवर्ती, गजबजलेल्या परिसरात असल्याने चोरीचा प्रयत्न शक्य नसल्याने त्याने गोट्याला फितवले. स्वत:च्या घरात चोरीचा प्लॅन त्याच्या डोकीत शिरविला. दागिने विक्रीतून आलेल्या रक्कमेतून महागडा मोबाईल,चैनीच्या वस्तूचेही त्याने अमिष दाखविले.

म्होरक्या बहोत खुश !

गोट्या खूश झाला… आई आणि बहीण घरातून बाहेर पडल्यावर चोरकप्प्याचा दरवाजा उघडून त्यामधील 18 तोळ्याच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याचा त्याचा प्लॅन निश्चित झाला. त्याने सर्व दागिने लंपास करून म्होरक्याच्या ताब्यात दिले. म्होरक्या बहोत खूश…. दागिने विक्रीला गेलो तर पोलिस पकडणार… त्याने आई आजारी असल्याचे कारण सांगून सोने गहाण ठेवून त्यावर पैसेउचलले.

काय बी करा, पार्टी झालीच पाहिजे!

सहावीच्या वर्गात शिक्षण घेणारा गोट्या (टोपन नाव) टिंबर मार्केटमधील 21 वर्षीय तरुणाच्या नादाला लागला. त्यात आणखी दोन अल्पवयीन मुलांचा समावेश… चार-पाचजणांचं जणू टोळकं बनलं होतं. दंगामस्ती… सायंकाळला खाऊगल्लीतला वावर… रोज एकाचा खर्च… गोट्यासह दोन्हीही मुले आठवड्यातून दोनवेळा खर्च पेलायची… पैसे कोठून आणायचे हे त्यांनाच ठाऊक; पण त्यावर चर्चा नव्हती. म्होरक्याला कारण सांगूनही चालत नव्हते. त्याचा आदेश शब्दप्रमाण… पार्ट्यांचा खर्च वाढत होता. काय बी करा, रोजची पार्टीच झाली पाहिजे हा दंडक…

18 तोळ्यांसाठी गोट्याला मोबाईल गिफ्ट!

मुबलक पैसे मिळाल्यानंतर म्होरक्याचा आणखी रुबाब वाढला. त्याचा चैनीवरील खर्च वाढू लागला. कधी कधी एकटा चैनी करू लागला. मुलाने गिफ्टचा तगादा लावताच म्होरक्याने मोबाईल खरेदी करून गोट्याला गिफ्ट दिला. गोट्याही खूश… नवा मोबाईल मिळाला ना..! आईसह बहिणीने खडसावून विचारले; पण थातूरमातूर उत्तरे देऊन त्यांनाच धाकात घेऊ लागला आणि चार-पाच दिवसांतच त्याचे बिंग फुटले.

हेही वाचलं का? 

Back to top button