दहावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर, गुणांची लयलूट! | पुढारी

दहावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर, गुणांची लयलूट!

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा : दहावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्यांदाच राज्य मंडळाकडून परीक्षा न घेता नववी व दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

आठ वर्षांनंतर प्रथमच कोल्हापूर विभागाची राज्य क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरण झाली. यंदाही निकालात मुलीच अव्वल ठरल्या असून, मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा गतवर्षाच्या 1.75 टक्क्याच्या तुलनेत यावर्षी केवळ 0.03 टक्के अधिक आहे.

कोल्हापूर विभागाचा निकाल 99.92 टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या 97.64 टक्क्यांच्या तुलनेत यंदा निकालात 2.28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, विभागात कोल्हापूर जिल्हा यंदा मागे पडला असून, सांगली जिल्हा 99.94 टक्केवारीसह प्रथम क्रमांकावर आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी मोजक्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर केला. यावर्षीचा निकाल हा ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार आहे.

यंदा कोरोना संसर्गामुळे दहावीची लेखी परीक्षा झाली नाही. विद्यार्थ्यांचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन (30 गुण), गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन (20 गुण), नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल (50 गुण) या सगळ्याच्या आधारे निकाल तयार करण्यात आला आहे.

निकालाची टक्केवारी 99.92 टक्के

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत 2 हजार 299 माध्यमिक शाळा आहेत. विभागातील माध्यमिक शाळांमधील 1 लाख 34 हजार 940 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 1 लाख 34 हजार 939 मुलांचे अंतर्गत मूल्यांकन करण्यात आले. त्यामधील 1 लाख 34 हजार 833 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 99.92 टक्के आहे.

निकालाची तुलनात्मक स्थिती पाहता, मूल्यांकन झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 73 हजार 471 आहे. त्यामधील 73 हजार 403 मुले उत्तीर्ण झालीआहेत. त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 99.90 टक्के आहे. मूल्यांकन केलेल्या 61 हजार 468 विद्यार्थिनींपैकी 61 हजार 430 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण 99.93 टक्के आहे.

सातारा जिल्ह्यातील 40 हजार 166 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 40 हजार 165 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झाले. 40 हजार 134 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 99.92 टक्के आहे. सांगली जिल्ह्यातून 39 हजार 631 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 39 हजार 631 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले.

39 हजार 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 99.94 आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून 55 हजार 143 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. 55 हजार 143 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झाले असून, त्यापैकी 55 हजार 88 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 99.90 टक्के आहे.

निकालपत्रक कधी मिळणार?

दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रती व पुनर्मूल्यांकन पद्धतीचा अवलंब केला जातो. यावर्षी शासन निर्णयाप्रमाणे दहावीच्या परीक्षेचा निकाल माध्यमिक शाळास्तरावर विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आला आहे.

अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र, सराव परीक्षा व अन्य मूल्यमापन आदी परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना घरी दिल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळणे, पुनर्मूल्यांकन सुविधा या परीक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध असणार नाहीत. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका वाटपाबाबत अद्याप राज्य मंडळाने माहिती जाहीर केलेली नाही.

कोल्हापूर विभागाची राज्यस्तरावर घसरण

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर झाला. यातील सुमारे 300 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांचे हजारहून अधिक निकाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे निकालात त्यांची टक्केवारी जास्त दिसते. राज्यातील पाच जिल्ह्यांच्या निकालाची टक्केवारी 99.96 आहे. याच्या तुलनेत कोल्हापूर विभागाचा निकाल 99.92 टक्के आहे. यात केवळ 4 पॉईंटचा फरक असल्याचे विभागीय सचिवांनी सांगितले.

वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थी-पालकांतून संताप

निकालाची उत्सुकता शिगेला असतानाच वेबसाईट कॅ्रश झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचाही गोंधळ उडाला. मोबाईलमध्ये वेबसाईट ओपन होत नसल्याने विद्यार्थ्यांनी नेट कॅफेकडे धाव घेतली. शाळांकडेही फोनवरून चौकशी सुरू होती.

रात्री उशिरापर्यंत वेबसाईटवर निकाल पाहता आला नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालक कमालीचे संतप्‍त झाले होते.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल जाहीर केला. शुक्रवारी सकाळपासूनच विद्यार्थी-पालकांमध्ये याबाबत उत्सुकता होती.

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी दुपारी एक वाजता निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळावर भेट दिल्याने सर्व्हरवर ताण वाढला आणि वेबसाईट क्रॅश झाली.

काहीजणांना निकाल पाहता आल्याचेही सांगितले जात होते; पण दुपारनंतर ही वेबसाईट पूर्णपणे बंदच पडली. ती रात्री उशिरापर्यंत ओपनच झाली नाही.

Back to top button