MLA Vinay Kore : 'आमदार विनय कोरेंची ईडीमार्फत चौकशी करा' | पुढारी

MLA Vinay Kore : 'आमदार विनय कोरेंची ईडीमार्फत चौकशी करा'

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ज्या नगरसेवकांना 35 लाख रुपये दिले त्या नगरसेवकांची नावे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांनी जाहीर करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

नगरसेवकांना देण्यासाठी आमदार कोरे यांनी कोठून रक्कम आणली याची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केले पत्रकार परिषदेस दिलीप पवार अनिल चव्हाण प्रशांत आंबे आरती रेडेकर दिलदार शेख आदी उपस्थित होते.

MLA Vinay Kore : काय म्हणाले होते विनय कोरे

कोल्हापूर शहराचा महापौर आपल्या पक्षाचा असावा, यासाठी त्यावेळी नगरसेवकांना ३५-३५ लाख रुपये दिले. ईर्ष्येच्या राजकारणात भावनिक होऊन तो घेतलेला एक चुकीचा निर्णय होता, अशी कबुली आमदार विनय कोरे यांनी दिली. आता पुन्हा तीच चूक करायची काय? सर्वसामान्यांना राजकारणाबद्दल आदर कमी होऊ नये तसेच कार्यकर्त्यांची राजकीय ईर्ष्या कमी करण्यासाठी जिल्ह्यातील निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याचे कोरे म्हणाले.

गोकुळ दूध संघात सत्तांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर जिल्हा परिषदेच्या राजकारणातही आ. कोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या टोकाच्या, ईर्ष्येच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांची निवडणूक बिनविरोध करण्यात आ. कोरे यांनी समन्वयकाची यशस्वी भूमिका बजावली होती. आता जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात आ. कोरे हेच केंद्रबिंदू आहेत.

दरम्यान, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आवाडे, महाडिक, यड्रावकर, राजू शेट्टी, हाळवणकर गटाला एकाच व्यासपीठावर आणत बिनविरोध करण्याचा प्रयत्न आ. कोरे करत आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिकेत पंधरा वर्षांपूर्वी ईर्ष्येच्या राजकारणाचे गाठलेले टोक ही आपली चूक होती, अशी प्रामाणिक कबुली देत आ. विनय कोरे म्हणाले, त्यावेळी महापालिकेच्या राजकारणात हसन मुश्रीफ आणि आम्ही एकत्र होतो. तर दुसर्‍या बाजूला सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक होते.

टोकाचे राजकारण केले. माझा महापौर करण्यासाठी नगरसेवकांना 35-35 लाख रुपये दिले. आमचा महापौर झाल्यानंतर बरे वाटले; परंतु लोकांचा माझ्याकडे बघण्याचा द़ृष्टिकोन बदलू लागला. त्यावेळी केलेली ती चूक मी मान्य करतो. भावनेच्या भरात केलेली ती चूक होती.

माणसाच्या हातून घडणारे काम नाही!

सर्वसामान्यांना राजकारणाबद्दल तिरस्कार वाटावा, असाच त्यावेळी प्रकार सुरू होता. आता पुन्हा तीच चूक करायची काय? राजकारणाबद्दल सर्वसामान्यांमधील आदर कमी होऊ नये. कार्यकर्त्यांची राजकीय ईर्ष्या कमी व्हावी यासाठी समन्वयकाची भूमिका घेऊन सर्वसमावेशक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. पैसा आणि ईर्ष्येच्या राजकारणातून बाजूला झालो.

हे परमेश्वराच्या कृपेने झाले; अन्यथा ते माणसाच्या हाताने होण्याचा विषय नाही, असे स्पष्ट करत आ. कोरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष वेधले. माणसाच्या हातून न घडणारे काम असून परमेश्वरानेच घडवले असे सांगून कोरे यांनी विधान परिषदेच्या टोकाच्या राजकारणाला मिळालेल्या पूर्णविरामाकडे कटाक्ष टाकला.

Back to top button