कोल्हापूर-सांगली महामार्गासाठी 850 कोटींचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे

कोल्हापूर-सांगली महामार्गासाठी 850 कोटींचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे

कोल्हापूर, सुनील सकटे : कोल्हापूर-सांगली महामार्गाची दुरवस्था दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे 850 कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. हा आराखडा केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीककडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. या आराखड्यात हातकणंगलेसह विविध ठिकाणी उड्डाण पुलाचे नियोजन आहे.

वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करायला भाग पाडणार्‍या कोल्हापूर-सांगली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यापूर्वी हा रस्ता सुप्रीम कंपनीकडे 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्त्वावर दिला होता; मात्र ठेकेदाराने केवळ 65 ते 70 टक्के काम करून टोल लावण्याची भूमिका घेतल्याने वाद सुरू झाला. ठेकेदार आणि राज्य शासनाच्या वादामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यास अडचण होती; मात्र नुकतेच या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले आहे.

हस्तांतरानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या मार्गाचे सर्वेक्षण करून केंद्र सरकारला अहवाल पाठविला आहे. या अहवालानुसार प्राथमिक आराखडा तयार केला आहे. हा आराखडा दोन महिन्यांपूर्वी दिल्ली येथील हाय पॉवर कमिटीकडे पाठविला आहे. या कमिटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर अंतीम अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या मार्गावरील अनेक ठिकाणी सेवामार्ग गायब आहेत. हातकणंगले, अतिग्रे, निमशिरगाव, तमदलगे आदी ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अपघात प्रवण क्षेत्र बनल्याने या ठिकाणी अपघात होतात. हातकणंगले आयटीआय, मजले, लक्ष्मीवाडीत रस्ता खचल्याने अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्ता दुभाजकांची दुरवस्था असून रस्ता दुभाजकच अपघातास निमंत्रण देत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news