

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून 50 कोटींचा निधी दिला आहे. त्याअंतर्गत अनेक विकासकामे करण्यात येत आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. संस्थान काळातील छत्रपती शिवाजी पूल, केशवराव भोसले नाट्यगृहासह शहरातील इतर पूल, हेरिटेज इमारती विद्युत रोषणाईने उजळणार आहेत. महापालिका इमारतीचाही लूक बदलला जाणार आहे. सहा कोटींच्या निधीतून हुतात्मा पार्कचा कायापालट केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. विविध कामांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री पाटील पत्रकारांशी बोलत होते. थेट पाईपलाईन योजनेबाबत ते म्हणाले, सोळांकूरमधील योजनेचे बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. धरण क्षेत्रातील जॅकवेलचे काम सुरू करण्यासाठी पाण्याचा उपसा केला जात आहे.
निधीतून शहरात 60 ठिकाणी सार्वजनिक सूचना यंत्रणा (पब्लिक अॅड्रेस सिस्टीम) बसविण्यात आली आहे. जिल्ह्यातही 710 ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. एकाच ठिकाणाहून जिल्ह्यातील नागरिकांना महत्त्वाची सूचना देण्यासाठीही ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी पुलाला रोषणाई
छत्रपती शिवाजी जुन्या पुलाला विद्युत रोषणाई करून पर्यटकांसाठी तो खुला करण्यात येईल. त्याबरोबरच केशवराव भोसले नाट्यगृह, जयंती पुलासह इतर पुलांचीही डागडुजी करून रोषणाई केली जाणार आहे. महापालिका इमारतीचा लूक बदलण्यात येणार आहे.
पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरण गेली अनेक वर्षे सुरू आहे. स्मशान भूमीला लागून असलेल्या जागा मालकाला टीडीआर किंवा इतर माध्यमातून मोबदला देऊन जागा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे स्मशनभूमीच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागेल, असेही पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister Satej Patil) यांनी सांगितले.
शहरात आणखी पाच सिग्नल…
शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांची वर्दळ असलेली ठिकाणे निवडून त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील, याविषयी अभ्यास करण्याच्या सूचना महापालिका अधिकार्यांना दिल्या होत्या. महापालिका प्रशासनाने शहरात आणखी पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच सिग्नल यंत्रणा सुरू होईल. त्या-त्या परिसरात वाहतुकीची होणारी कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.