Sambhaji Chhatrapati : ‘जनरल बिपीन रावत हे छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख’ | पुढारी

Sambhaji Chhatrapati : ‘जनरल बिपीन रावत हे छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख’

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : Tributes General Bipin Rawat : तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देशासाठी ही सर्वात धक्कादायक अशी घटना आहे. रावत यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला भारतीय हवाईदलाने दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, श्रीमती मधुलिका रावत यांचे व छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले, हे मनाला अजूनही पटत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणतात की, २०१७ साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवास जनरल रावत मोठ्या अभिमानाने उपस्थित राहिले होते. २०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मदतकार्य राबविण्यासाठी मला त्यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते.

छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता. मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट दिले असता त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता. दिल्ली येथील माझ्या निवासस्थानी ते आले असताना ताराबाई महाराणीसाहेबांचे तैलचित्र पाहून त्यांनी अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याबद्दल माहिती घेतली व युद्धशास्त्रात त्यांचा इतिहास शिकवला जावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. कोल्हापूर येथे लष्कराच्या कार्यक्रमास उपस्थित असताना मोठ्या आपुलकीने त्यांनी नवीन राजवाड्यास भेट देऊन छत्रपती घराण्याचा पाहुणचार स्वीकारला होता. जनरल रावत व त्यांच्या कुटुंबीयांशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अशा आकस्मिक व धक्कादायी जाण्याने एक मित्र व मार्गदर्शक गमावल्याची खंत मनाला लागून राहिली आहे…. संपूर्ण राष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले, असे व्यक्त होत त्यांनी जनरल रावत, श्रीमती मधुलिका रावत व त्यांच्यासोबतच्या अकरा मृतात्म्यास भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Back to top button