कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे मानवी आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होत आहे. यामध्ये संसर्गजन्य असणार्या क्षयरोगाचे प्रमाण वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रभावीपणे उपाययोजना राबविण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यातील 82 गावे क्षयरोगमुक्त झाली आहेत. क्षयरोग मुक्त गावांची संख्या वाढविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
संसर्गजन्य असणार्या क्षयरोगाचे प्रमाण खूप अधिक आहे. जागतिक पातळीवर आढळून येणार्या क्षयरोग (टीबी) रुग्णांपैकी 26 टक्के रुग्ण भारतात आढळतात. यावरून या आजाराच्या प्रसाराची गती लक्षात येते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये यासंदर्भात घरोघरी सर्वेक्षण करून लक्षणे आढळताच त्यांना उपचारासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. यामुळे जिल्ह्यातील 82 गावे क्षयरोग मुक्त झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक 17 गावे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. यापाठोपाठ आजरा तालुक्यातील 16 गावांचा समावेश आहे. बेडकायुक्त खोकला, हलकासा परंतु रात्री येणारा ताप, वजन व भूक कमी होणे. बडक्यातून रक्त पडणे. थकवा, छातीत दुखणे, रात्री घाम येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.
जिल्ह्यातील सर्व गावांचे सर्वेक्षण पूर्ण करून सन 2024 मध्ये निकषामध्ये बसणारी गावे क्षयरोगमुक्त करण्यासाठी निश्चित करण्यात येतील. त्यानंतर संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
– डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद