crime news : ...तरीही महिलांवरील अत्याचारात वाढ का? | पुढारी

crime news : ...तरीही महिलांवरील अत्याचारात वाढ का?

कोल्हापूर ; दिलीप भिसे : लॉकडाऊननंतर अनलॉकमध्येही शहर, जिल्ह्यात गंभीर घटनांचा वाढता आलेख धक्‍कादायक आहे. विशेषत: महिलावरील अत्याचाराचे प्रमाण चिंता वाढविणारे आहे. 2019 व 2020 तुलनेत जानेवारी ते नोव्हेंबर 2021 अखेर पुरोगामी समजल्या जाणार्‍या जिल्ह्यात 162 अभागी वासनेच्या शिकार ठरल्या आहेत.(crime news) 316 युवतींना अतिप्रसंगांना सामोरे जावे लागले आहे.

हनी ट्रॅप, खासगी सावकार, तस्कर, संघटित टोळ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणा अ‍ॅक्शन मूडमध्ये असताना महिलांवर होणार्‍या अत्याचाराचा टक्‍का का वाढतो आहे, हा सवाल आहे. समाजकंटकांवर कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, अशीही विचारणा होऊ लागला आहे. वर्षभरात काळ्याधंद्याच्या भरभराटीसह खून, खुनाचे प्रयत्न, जबरी चोरी, गर्दी मारामारी, दुखापतीच्या घटनांमधील वाढ सामाजिक स्वास्थ बिघडविणारी आहे. (crime news)

अमानुष घटना लौकिकाला घातक !

कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात 2019 ते 30 नोव्हेंबर 2021 काळात अत्याचार आणि विनयभंग या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत राहिली आहे. तीन वर्षांत 390 पीडितांचे लौकिक शोषण अत्याचार तर 793 युवतींना विनयभंग यासारख्या घटनांना तोंड द्यावे लागले आहे. सुसंस्कृत, धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा, पुरोगामी विचारांचा लौकिक असलेल्या नगरीतील वाढत्या समाजहिताला बाधक ठरणार्‍या आहेत.

अनलॉकमध्येही काळेधंदे, जुगार, तस्करीत कमालीची वाढ (crime news)

लॉकडाऊन काळात समाजातील सर्वच घटकांची वाताहत झालेली असताना अनलॉकमध्ये शेकडो बेरोजगारासमोर रोजीरोटीची चिंता आहे. अनलॉकमध्ये जिल्ह्यात मटका, तीनपानी जुगारी अड्ड्यांसह काळेधंदे, अमली तस्करीत वाढ झाल्याचे चित्र आहे. जानेवारी ते 30 नोव्हेंबर या काळात दारू तस्करीप्रकरणी 2345 व जुगाराचे 909 गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये हे प्रमाण अनुक्रमे जुगार 509, 554 तर दारूबंदी 1245, 1394 होते. लॉकडाऊन काळात हे प्रमाण कमालीचे वाढल्याचे दिसून येते.

झटपट कमाईचा फंडा!

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने अनेक तरुण काळ्याधंद्यातील कमाईला सोकावले आहेत. लॉकडाऊन उठविल्यानंतरही विनासायास मिळकतीचे त्यांनी अड्डे सोडले नाहीत. कोणी तीन पानी, कोणी मटका तर कोणी तस्करीत गुंतला आहे. जुगार आणि दारू तस्करीप्रकरणी अकरा महिन्यात तब्बल 3 हजार 254 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

हनी ट्रॅपमधून जिल्ह्यातील बड्या व्यावसायिकांची लूट

लॉकडाऊन काळात शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीत कमालीची वाढ झाली असून, त्यात आर्थिक गुन्ह्यांचा सर्वाधिक समावेश आहे. मुंबई, पुण्यासह बॉलीवूडमधील हनी ट्रॅपचे लोण पश्‍चिम महाराष्ट्रात विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यात आले आहे. युवतींना पुढे करून अश्‍लील चित्रफितीच्या आधारे बड्या बड्या उद्योजक, व्यावसायिकांना ब्लॅकमेल करून संबंधितांकडून लाखोंची खंडणी वसुलीचा नवा फंडा जोमाने सुरू झाला आहे.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी फसगत झालेल्या मंडळींना विश्‍वासात घेऊन संघटित टोळ्याविरुद्ध कारवाईच्या सूचना केल्याने जिल्ह्यात आजवर 7 गुन्ह्यांच्या नोंदी झाल्या आहेत. दाखल होणार्‍या हनी ट्रॅप गुन्ह्यांकडे जिल्ह्याचे नव्हे राज्याचेही लक्ष लागले आहे.

Back to top button