कोल्हापूर : के. पी. पाटील लवकरच महाविकास आघाडीत

कोल्हापूर : के. पी. पाटील लवकरच महाविकास आघाडीत

कोल्हापूर / बिद्री, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत राधानगरी-भुदरगड मतदारसंघाने महाविकास आघाडीला दिलेल्या 65 हजारांच्या मताधिक्यामुळे तेथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुतीच्या प्रचारात असलेले बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार के. पी. पाटील हे महाविकास आघाडीत लवकरच प्रवेश करणार आहेत. राधानगरी-भुदरगड विधानसभेची जागा आघाडीत कोणत्या पक्षाला जाईल, त्या पक्षात के. पी. पाटील प्रवेश करतील, हे आता स्पष्ट झाले आहे.

के.पी. हे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात होते; मात्र निकालानंतर महाविकास आघाडीचे खा. शाहू महाराज आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी काढलेल्या आभार दौर्‍यावेळी के.पी. यांच्या मुदाळ गावात त्यांचे कमान उभारून स्वागत केले. कमानीवर खा. शाहू महाराज व सतेज पाटील यांची छायाचित्रे होती. तसेच त्यांनी त्यांचा सत्कार केला, तेव्हा सतेज पाटील यांनी के. पी. पाटील यांना सहकार्याबद्दल धन्यवाद, असे म्हणत हात जोडले. यातून पाटील यांची भावी राजकीय वाटचाल स्पष्ट झाली आहे.

के. पी. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे समर्थक मानले जातात. त्यामुळे महायुती म्हणून त्यांचे राजकीय विरोधक आ. प्रकाश आबिटकर यांच्याबरोबर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रा. मंडलिक यांच्या प्रचारात उतरावे लागले होते. भुदरगड तालुक्याची राजकीय अडचण पाहता धनुष्यबाणाऐवजी महायुतीला किंवा मंडलिक यांना विजयी करा, असे अनेक ठिकाणच्या भाषणात ते सांगत होते. बिद्रीची नुकतीच निवडणूक झाली होती. त्यातील बोचरी भाषणे ताजी होती. त्यामुळे जरी के. पी. पाटील महायुती म्हणून सहभागी झाले असले तरी कार्यकर्ते व समर्थकांत मात्र चलबिचलता होती. तसे मतपेटीतून दिसून आले आहे. काही समर्थकांनी सोशल मीडियावर शरद पवार यांचे फोटो झळकावले होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर के. पी. पाटील बांधणी करीत असल्याचे दिसते. भुदरगडच्या राजकीय अडचणीमुळे वेगळा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटायला नको. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर असणारे सौहार्दाचेे संबंध, शक्तिपीठ महामार्गाबद्दल महायुती सरकारविरोधी घेतलेली स्पष्ट भूमिका, यामुळे राजकारणातील नव्या अध्यायाचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, सध्या सुरू असणार्‍या राजकीय घडामोडींबाबत के. पी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी समाजमाध्यमांवर या चर्चा आहेत. याबाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

'बिद्री' आणि उपप्रकल्प!

'बिद्री'चे उपप्रकल्प राबविताना शासन परवानगीवेळी अनेक अडचणींना के. पी. पाटील यांना सामोरे जावे लागले आहे. एकदा तर सहकारमंत्र्यांच्या दालनातून ते रागाने बाहेर पडले होते. त्यामुळे खुद्द त्यांनी त्यांच्या नेत्यांनाही निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नव्या अध्यायाला दुजोरा मिळत आहे.

2019 चा निकाल

* प्रकाश आबिटकर (शिवसेना) 1 लाख 05 हजार 881 (सध्या शिंदे शिवसेना)
* के. पी. पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) 87 हजार 451
* अरुण डोंगळे (अपक्ष) 15 हजार 414
* राहुल देसाई (अपक्ष) 12 हजार 895
* सत्यजित जाधव (अपक्ष) 5 हजार 252
* जीवन पाटील (वंचित आघाडी) 7 हजार 832

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news