तिलारी घाट अवजड वाहनांसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत बंद

तिलारी घाट अवजड वाहनांसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत बंद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात संभाव्य अपघात टाळण्यासाठी तिलारी घाट अवजड वाहनांसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी दिले. या मार्गावरील एसटी वाहतूकही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तिलारी घाटाऐवजी अवजड वाहतुकीसाठी आंबोली आणि चोर्ला या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तिलारी घाटातून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. हा घाट हा खूपच अरुंद असल्याने घाटामध्ये वारंवार अपघात घडत होत असतात. घाट अवजड वाहतुकीस अत्यंत धोकादायक आहे. घाटातील तीव्र चढ-उतारामुळे रस्त्यांच्या वळणांवर वाहनांना योग्य प्रकारे वळण घेता येत नाही. त्यामुळे घाटामध्ये यापूर्वी अनेक मोठे अपघातही झाले आहेत. घाटात अवजड वाहतुकीमुळे तीव्र वळणांवर वाहन अडकून राहते, ते काढण्यासाठी क्रेन घेऊन जाणेसुद्धा अवघड होते. मोठ्या क्रेनचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास क्रेनचाही अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

बेळगाव, कर्नाटक येथून गुगल मॅपवर गोव्यास जाणारा जवळचा रस्ता तिलारी घाटातून दाखवला जातो. यामुळे अनेक वाहन चालक या घाटातून प्रवास करतात. मात्र, घाटाचा अंदाज चालकाला येत नाही. गुगल मॅपवरून परराज्यातून येणार्‍या अवजड वाहनांवरील चालक हे या घाटाचा अंदाज नसतानाही अवजड वाहन तिलारी घाटातून घेऊन जाण्याचे धाडस करतात. त्यामुळे अपघाताच्या व वाहने घाटामध्ये अडकून राहण्याच्या घटना घडत आहेत

सध्या चंदगड तालुक्यासह तिलारी घाट परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टी होत आहे. त्यातच घाटातील बर्‍याच ठिकाणी रोडच्या बाजूचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटामधून एस.टी. वाहतूकसुध्दा सुरू असते. यामुळे अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे तिलारी घाट मोटार वाहन कायदा 115 व 116 अन्वये अवजड वाहतुकीसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मार्गाच्या दोन्ही बाजूस घाट बंद करण्यात आल्याची तसेच कमी उंचीचे बार लावण्याचीही सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news