योग अभ्यास : आरोग्य ते करिअरचा मार्ग

योग अभ्यास : आरोग्य ते करिअरचा मार्ग

[author title="सागर यादव" image="http://"][/author]

कोल्हापूर : योग आज एक जीवनशैली म्हणून नावारूपाला आला आहे. माणसाला शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्य देणारा योगा हा सहजसोपा व्यायाम आहे. योगातील आसन, प्राणायाम, ध्यान यांच्या अभ्यासाने केवळ शरीरालाच नव्हे, तर मनालाही शिस्त लागते. असे महत्त्व असणारा योग आज जगभर पोहोचला आहे. इतकेच नव्हे, तर योग अभ्यास म्हणजे आरोग्यापासून करिअरचा मार्ग बनला असल्याची माहिती योग प्रशिक्षिका सौ. प्रीती श्रीधर चव्हाण यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली.

सन 2024 हे योग वर्ष 'महिला सक्षमीकरण' या संकल्पनेवर आधारित असल्याने या निमित्ताने सौ. चव्हाण यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, भारतात योग अभ्यासाची प्राचीन परंपरा आहे. देश, राज्य व स्थानिक पातळीवर योग प्रशिक्षण, अभ्यास करणार्‍या विविध संस्था-संघटना सक्रिय आहेत. विवेकानंद योग संस्था, योग विद्याधाम, पतंजली योगपीठ, कैवल्य धाम लोणावळा, योग विद्याधाम नाशिक, कालीदास विद्यापीठ रामटेक अशा संस्था-संघटनांच्या माध्यमातून योग प्रसाराचे काम सुरु आहे.

कोल्हापूरात योग अभ्यासाच्या विविध संधी

कोल्हापूरला योग अभ्यासाची मोठी परंपरा आहेच. हा वारसा विकसीत करण्याचे कार्य योग विद्या धाम, पतंजली योगपीठ व शिवाजी विद्यापीठ सारख्या संस्था-संघटना करत आहेत. शिवाजी विद्यापीठात आजीवन अध्ययन विभागातर्फे योग प्रशिक्षण वर्गातून दरवर्षी 100 योगशिक्षक तयार होतात. सन 2023 पासून एम.ए. योगशास्त्र विषय सुरु करण्यात आला आहे. ताराराणी विद्यापीठातही योगशास्त्र विषय शिकविला जातो. आयुष मंत्रालयाच्यावतीने योगा संदर्भातील ऑनलाईन व ऑफलाईन कोर्स सुरु असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
करिअरच्या संधीमुळे युवा वर्गाचा कल

कोणत्याही प्रकारच्या भांडवलाशिवाय स्वत:च्या आरोग्याबरोबरच करिअरच्या संधी उपलब्ध करून देणारे माध्यम असल्याने योगाकडे युवा वर्गाचा कल वाढल्याचे सौ. चव्हाण यांनी सांगितले. योग प्रशिक्षण, विविध माध्यमातील योगा, योग साधकांसाठीचा आहार, योगासाठी लागणारे मॅट, योगा संदर्भातील विविध पुस्तके यासह पूरक गोष्टीं संदर्भातील व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे योगा क्षेत्रात युवा वर्गासोबतच महिलांचा 50 टक्के सहभाग असल्याची माहिती सौ. चव्हाण यांनी दिली.

महिलांच्या आरोग्यासाठी योगशास्त्र

घरच्या जबाबदार्‍यांमुळे मन व शरीराच्या आजारपणावर उपचार म्हणून 2006 पासून योगाभ्यासाची सुरुवात केली. आवड निर्माण झाल्याने योग परिचय, योग प्रबोध, योगप्रवीण, योग शिक्षक हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केले. सन 2011 मध्ये शिवाजी विद्यापीठातून एम.ए. योगशास्त्र विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्यानंतर सन 2023 पासून विद्यापीठात एम.ए. योगशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहे. भविष्यात नेट परीक्षेसह योग विषयात पीएच.डी. करत महिला आरोग्यासाठी योगशास्त्र या विषयात काम करण्याचा मानस सौ. चव्हाण यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news